Nallasopara Crime News : खबऱ्याची ‘टीप’, पोलिसांची ‘रेड’ अन् गुटखा किंगच्या मुसक्या आवळल्या! नालासोपाऱ्यात पेल्हार पोलिसांचा थरार

•सना जनरल स्टोअर्सवर पोलिसांची धाड; एकाला बेड्या ठोकून कारवाईचा बडगा
नालासोपारा | शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची गुपचूप विक्री करणाऱ्यांविरुद्ध पेल्हार पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. नालासोपारा पूर्व येथील ‘सना जनरल स्टोअर्स’वर पोलिसांनी छापा टाकून 6 लाख 39 हजार 493 रुपये किमतीचा साठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी दुकानचालकाला अटक करण्यात आली असून नालासोपारा स्टेशन रोड परिसरात या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
अशी झाली कारवाई
दिनांक 25 डिसेंबर रोजी पेल्हार पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वाघचौरे यांना एका खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती. खान चौक येथील सना जनरल स्टोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आणून ठेवण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ दुकानाची झडती घेतली असता, तिथे पोत्यांमध्ये भरलेला शासनाने बंदी घातलेला तंबाखूजन्य साठा मिळून आला.
आरोपीला अटक आणि गुन्ह्याची नोंद
या प्रकरणी पोलिसांनी जावेद अहमद इब्राहिम अहमद अन्सारी (वय 38) याला ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123 आणि अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारा आणि वसई-विरार परिसरात अमली पदार्थ आणि प्रतिबंधित गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे या कारवाईमुळे दणाणले आहेत.
पोलीस पथकाची कामगिरी ही यशस्वी कामगिरी
पोलीस उप-आयुक्त सुहास बावचे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शकील शेख आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वाघचौरे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.



