Nalasopara News : ‘मृत्यूचा शॉर्टकट’ ; नालासोपारा स्थानकात पोलिसाचा रुळ ओलांडताना मृत्यू!

•कांदिवली समता नगर पोलीस ठाण्यातील हवालदार गणेश राऊळ यांचा लोकलच्या धडकेत मृत्यू
नालासोपारा :- नालासोपारा रेल्वे स्थानकात मंगळवारी दुपारी रुळ ओलांडताना कांदिवलीच्या समता नगर पोलीस ठाण्यातील हवालदार गणेश राऊळ (32 वय) यांचा मृत्यू झाला. दुपारी सुमारे 2.30 वाजता फलाट क्रमांक 4 वरून चर्चगेटकडे जाणारी लोकल पकडण्याच्या घाईत त्यांनी जिन्याऐवजी रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र वेगाने आलेल्या लोकलने त्यांना जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
राऊळ हे नालासोपारा येथे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास होते. घटनेची माहिती वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी दिली. सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास बर्वे यांनी सांगितले की, मंगळवारी राऊळ यांनी कामावर उशीर होणार असल्याची माहिती दिली होती. बुधवारी त्यांच्या पार्थिवावर नालासोपारा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
रेल्वे आकडेवारीनुसार, रुळ ओलांडताना अपघातांचे प्रमाण अत्यंत जास्त असून मागील 10 वर्षांत 14 हजार जणांनी जीव गमावला आहे. प्रवासी सुरक्षेसाठी सातत्याने जनजागृती मोहीम राबवली जात असली तरी ‘मृत्यूचा हा शॉर्टकट’ थांबण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत.



