Mumbai Political News : काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या दीराचा भाजपमध्ये प्रवेश!

•अनिल धानोरकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत हाती घेतले कमळ, तिसऱ्यांदा बदलला पक्ष
मुंबई :- राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असतानाच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे मोठे बंधू अनिल धानोरकर यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे 10 नगरसेवकही भाजपमध्ये सामील झाले आहेत.
भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. अनिल धानोरकर यांचा हा तिसरा पक्षप्रवेश आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत काम केले आहे.
कोण आहेत अनिल धानोरकर?
अनिल धानोरकर हे भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांनी दोन वर्षांपासून शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वात धानोरकर कुटुंबाची भद्रावती नगरपरिषदेवर एकहाती सत्ता आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना वरोरा विधानसभा क्षेत्रातून तिकीट नाकारले होते. तेव्हा त्यांनी प्रतिभा धानोरकर यांच्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती आणि वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.
आता आगामी निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या प्रवेशामुळे महाविकास आघाडीला, विशेषतः काँग्रेस आणि ठाकरे गटाला, चंद्रपूर जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.



