Vaibhav Khedekar : मनसेला कोकणात धक्का, राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी

•‘पक्षनिष्ठा कमी पडली’, हकालपट्टीनंतर खेडेकर भावूक; पुढील राजकीय भूमिकेबाबत सस्पेन्स
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) कोकणातील एक प्रमुख चेहरा आणि राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते भाजप किंवा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर, पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून मनसेने त्यांच्यावर ही कठोर कारवाई केली. हकालपट्टीनंतर पत्रकार परिषद घेत खेडेकर यांनी आपली बाजू मांडताना ते भावूक झाल्याचे दिसून आले.
पत्रकार परिषदेत बोलताना खेडेकर म्हणाले की, “सोशल मीडियावर माझ्यासह जिल्हाध्यक्ष आणि इतर दोघांना बडतर्फ केल्याचे पत्र वाचून खूप दुःख झाले. हे पत्र म्हणजे माझ्या निष्ठेचे सर्टिफिकेट आहे.” त्यांनी आपल्या पक्षनिष्ठेचा दाखला देत सांगितले की, पक्षासाठी अनेक आंदोलने केली, तुरुंगातही गेलो आणि कोकणात मनसेची बीजे रुजवण्यासाठी प्रयत्न केले. खेड नगर परिषदेत 15 वर्षे त्यांच्या नेतृत्वाखाली मनसेची सत्ता होती आणि ते स्वतः थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते.
राज ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न, पण…
खेडेकर यांनी आपल्यावर झालेल्या कारवाईचे कारण स्पष्ट करताना म्हटले की, “मी भाजपच्या काही लोकांना भेटलो, म्हणून माझ्यावर पक्षांतर करत असल्याचा संशय घेण्यात आला. पण मी पक्षप्रवेश करणार नव्हतो.” एका कार्यकर्त्यावरील तडीपारीची कारवाई थांबवण्यासाठी आपण आमदार नितेश राणे यांना भेटलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. विकासकामांसाठी सत्ताधाऱ्यांशी संवाद साधणे महत्त्वाचे असल्यामुळेच भेटीगाठी होत होत्या, असा बचाव त्यांनी केला. मात्र, या संशयाबद्दल राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना अद्याप भेट मिळाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून भेटीसाठी अनेक प्रयत्न केले, पण यश आले नाही, हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. “हे पत्र साहेबांनी स्वतः काढले असते, तर तो त्यांचा आदेश आल्याचा आनंद बाळगला असता,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पक्षाची शिस्त कधीही बिघडवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘साहेब, तुम्ही फार घाई केली…’
पत्रकार परिषदेत भावूक होत खेडेकर म्हणाले की, “राज ठाकरे साहेब, आपण फार घाई केली. तुम्ही कालही मनात होता, आजही आहात आणि उद्याही राहाल.” गेल्या 30 वर्षांपासून पक्ष म्हणून कुटुंबाशी जोडलो गेलो होतो, पण या पत्रामुळे कौटुंबिक संबंधाला ब्रेक लागल्याचे त्यांना वाटले. “असे पत्र मला कधीच अपेक्षित नव्हते,” असे म्हणत त्यांनी आपला धक्का व्यक्त केला. ‘हातात घेतलेले शिवधनुष्य अर्धवट ठेवणार नाही,’ असे सांगत त्यांनी पुढील राजकीय भूमिकेबाबत सस्पेन्स कायम ठेवला. “मी अजून निर्णय घेतलेला नाही,” असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.



