Kalyan News : “आम्ही या भागातील भाई आहोत, एकेकाला हालहाल करून मारू!” – कल्याणमध्ये गुंडांची दहशत

•आईस्क्रीम खाऊन घरी जाणाऱ्या 16 वर्षीय मुलाला बेदम मारहाण; कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कल्याण :- कल्याण पूर्वेकडील कैलासनगर भागातील हनुमाननगर, विठ्ठलवाडी परिसरात गुंडांनी मोठी दहशत माजवली आहे. ‘आम्ही या भागातील भाई आहोत’ अशा धमक्या देत साहिल उर्फ बिट्या संजय मोरे आणि त्याच्या दोन साथीदारांनी आईस्क्रीम खाऊन घरी चाललेल्या एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेदहा वाजता घडली.
नेमके काय घडले?
पीडित अल्पवयीन मुलगा रात्री साडेदहाच्या सुमारास हनुमान मंदिराजवळील हातगाडीवर आईस्क्रीम खाऊन एकटाच घरी परतत होता.त्यावेळी वाटेत त्याला साहिल उर्फ बिट्या संजय मोरे, दीपक ढेरे आणि साहिल (पूर्ण नाव नाही) हे तिघे भेटले.या गुंडांनी त्याला उद्देशून, “तुझ्या वडिलांना सांग, पोलीस ठाण्यातील तक्रार मागे घे, अन्यथा आमच्याशी गाठ आहे” असे बोलून शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.मारहाण होत असताना तो मुलगा बचावासाठी ओरडत होता, पण या गुंडांच्या दहशतीमुळे कोणीही मदतीला पुढे आले नाही.तिघांनी मुलाला पकडून खेचत जनसेवा मंडळ कार्यालय परिसरात नेले आणि तेथे बेदम मारहाण केली.यावेळी दीपक ढेरे याने बांबूची काठी आणून त्या काठीने मुलाला मारहाण केली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
गुंडांनी मोठ्याने ओरडून “या ठिकाणी आमचीच चालते. आम्ही येथले भाई आहोत. आमच्या सांगण्याप्रमाणे येथल्या लोकांनी वागायचे, अन्यथा प्रत्येकाची अशी हालत करून टाकू” असे बोलून परिसरात दहशत माजवली.
परिसरात भीतीचे वातावरण
या तीन गुंडांच्या उपद्रवामुळे विठ्ठलवाडी कैलासनगर परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. गुंडांच्या भीतीमुळे अनेक कुटुंबीय आपल्या मुलींना घराबाहेर पाठवत नाहीत. मारहाणीच्या वेळी भीतीने रहिवाशांनी घराची दारे बंद केली, तर दुकानदारांनी दुकाने बंद करून पळ काढला.
अल्पवयीन बालकाच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी साहिल उर्फ बिट्या संजय मोरे, दीपक ढेरे आणि साहिल या तिन्ही गुंडांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा आणि भारतीय न्याय संहिता कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पडवळ या प्रकरणाचा तपास करत आहेत. परिसरातील नागरिकांनी या तिन्ही गुंडांचा तात्काळ बिमोड करण्याची मागणी केली आहे.



