Mumbai Local Live Update : मध्य रेल्वेवर मोठा गोंधळ! मालगाडीचे चाक घसरल्याने लोकल सेवा ठप्प

•बदलापूर-अंबरनाथ दरम्यान दुर्घटना; मुंबईकडे येणाऱ्या लोकल रखडल्या
कल्याण :- मुंबईसह उपनगरांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आधीच विस्कळीत झालेल्या मध्य रेल्वेच्या सेवेवर आज दुपारच्या सुमारास आणखी एक संकट आले. बदलापूर आणि अंबरनाथ दरम्यान मालगाडीचे चाक रुळावरून घसरल्याने सीएसएमटीकडे येणारी लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली. ही घटना आज दुपारी 1.30 वाजता घडली.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सकाळपासूनच लोकल सेवा विलंबाने सुरू होती. त्यातच, दुपारी बदलापूर-अंबरनाथ मार्गावर एका मालगाडीचे चाक घसरले. यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्व लोकल थांबल्या. कर्जत, खोपोली आणि अंबरनाथहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला. वांगणी, भिवपुरी आणि कर्जत या स्थानकांदरम्यान अनेक लोकल एकामागे एक थांबून राहिल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.
मध्य रेल्वेने दिले स्पष्टीकरण
या घटनेबाबत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली. “रिमझिम पाऊस आणि तांत्रिक कारणामुळे मालगाडी अप दिशेवर थांबली आहे. मालगाडीला बाजूला करण्यासाठी सहाय्यक इंजिन पाठवण्यात आले आहे,” असे त्यांनी सांगितले.
लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले
या दुर्घटनेमुळे फक्त लोकलच नाही, तर कसारा आणि कर्जतहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्याने धीम्या मार्गावरील प्रवाशांची आणखी गैरसोय होत आहे. मालगाडी लवकर बाजूला करून सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



