
Ashish Shelar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या ‘पॉकेट बुक’वरून शेलारांचा खोचक टोला; मनसे-ठाकरे युतीवरही साधला निशाणा
मुंबई | मुंबई महापालिकेच्या निवडणुका Mumbai BMC जाहीर होताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या ‘करून दाखवलं’ या घोषणेचा समाचार घेत, त्यांच्यावर कवितेतून जहरी टीका केली आहे. या कवितेत शेलारांनी ठाकरे गटाचे ‘पॉकेट बुक’, काँग्रेससोबतचे त्यांचे संबंध आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना धारेवर धरले आहे.
काय आहे आशिष शेलारांची कविता?
शेलार यांनी आपल्या ट्विटर (X) अकाऊंटवरून शेअर केलेली कविता सध्या मुंबईच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे:
“स्वतः केलेली कामे दुर्बीण लावून स्वतःच शोधत आहेत
घरोघरी जाऊन पॉकेट बुक वाटत आहेत….
“करुन दाखवलं” चे गाताय जर गाणे,…..पॉकेट बुक मध्ये कशाला लावली मग द्वेषाची पाने?
अंगात नाही बळ तरी काँग्रेसची स्वबळाची भाषा…तथाकथित मर्दांच्या पक्षाला मात्र…मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा
मारली लाथ काँग्रेसने जोराची…..आता उभे राष्ट्रवादी(शप) च्या दारात पसरुन पदर….म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर….यांनी काय केले..सजवली याकूब मेमनची कबर
ज्यांच्या जगण्यात उरला नाही भगवान राम …..काय करणार हे मुंबईकरांसाठी काम ?
राज ठाकरेंवरही ओढले ताशेरे कल्याण-डोंबिवली आणि मुंबईत उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येण्याच्या हालचालींवरून शेलारांनी ‘मनसे’लाही लक्ष्य केले आहे. “तथाकथित मर्दांच्या पक्षाला मात्र मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा,” असे म्हणत त्यांनी या संभाव्य युतीची खिल्ली उडवली आहे.
हिंदुत्व आणि याकूब मेमनचा उल्लेख शेलार यांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घेरताना थेट याकूब मेमनच्या कबरीचा संदर्भ दिला. काँग्रेसने लाथ मारल्यानंतर आता ठाकरे गट राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) दारात पदर पसरून उभा असल्याची टीका त्यांनी केली. “यांनी काय केले.. सजवली याकूब मेमनची कबर,” असे म्हणत शेलारांनी मुंबईकरांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला आहे.
“ज्यांच्या जगण्यात उरला नाही राम…” कवितेच्या शेवटी शेलार म्हणतात की, ज्यांच्या आयुष्यात आता भगवान राम उरले नाहीत, ते मुंबईकरांसाठी काय काम करणार? या ओळींमधून त्यांनी ठाकरे गटाच्या बदललेल्या राजकीय भूमिकेवर प्रहार केला आहे.
राजकीय संघर्ष तीव्र निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून आशिष शेलार हे सातत्याने उद्धव ठाकरेंना टार्गेट करत आहेत. यापूर्वीही त्यांनी अशाच प्रकारे काव्यातून टीका केली होती. आता या ‘काव्ययुद्धा’ला ठाकरे गटाकडून काय उत्तर मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



