महाराष्ट्र
Trending

“शिवसेनेचा बाप मीच” : भाजप नेते परिणय फुकेंच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले?

Parinay Fuke : शिंदे गट आक्रमक, माफीची मागणी; तर दीपक केसरकर यांच्याकडून संयमी प्रतिक्रिया

नागपूर :- भाजप नेते आणि माजी मंत्री परिणय फुके Parinay Fuke यांनी भंडारा येथील एका कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेनेबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “शिवसेनेचा बाप मीच आहे” असे विधान त्यांनी केल्याने शिंदे गटाचे शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. या वक्तव्यानंतर शिंदे सेनेने आक्रमक भूमिका घेत फुकेंनी माफी मागावी, अन्यथा ‘शिवसेना स्टाईल’ने उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.

परिणय फुके भंडारा येथे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी, “पोरगा दहावीत पास झाला तर आईने केलं म्हणतात, आणि काही खराब झालं तर बापाने केलं म्हणतात. त्यामुळे मला आता पक्कं माहीत झालं की शिवसेनेचा बाप मीच आहे, कारण सगळं खापर माझ्यावर फोडत आहेत,” असे म्हटले. त्यांनी कार्यकर्त्यांना या आरोपांकडे लक्ष न देता पक्ष वाढवण्याचे काम सुरू ठेवण्यास सांगितले. तसेच, विधान परिषदेसाठी आपल्याला दुसऱ्यांदा संधी दिल्याबद्दल त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे जाहीर आभार मानले.

फुकेंच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार आक्षेप घेतला. त्यांनी फुकेंनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणी केली आहे. माफी न मागितल्यास त्यांना शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी मात्र अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिली आहे. “एखाद्या व्यक्तीच्या विधानाला पक्षाचे विधान मानू नये. परिणय फुके माझे मित्र आहेत, परंतु अशी विधाने करण्यापासून सर्वांनी संयम बाळगला पाहिजे. शेवटी, हे युतीचे सरकार आहे आणि लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे लोकांची सेवा कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे आणि केलेल्या कामांना प्रसिद्धी दिली पाहिजे,” असे सांगत केसरकर यांनी वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या विधानामुळे भाजप आणि शिंदे गट यांच्यातील संबंधांमध्ये काही प्रमाणात तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0