मुंबई

Mumbai Crime News : शाळांच्या आसपास तंबाखू विक्रीवर मुंबई पोलिसांचा धडक मोहिमेने लगाम!

•बाल न्याय अधिनियमांतर्गत 8 जणांवर गुन्हे दाखल; 100 मीटर परिसरातील 56 पानटपऱ्यांवर निष्कासन कारवाई

मुंबई | शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरु होताच विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला लगाम घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांनुसार, शाळा व महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरात तंबाखू, अंमली पदार्थ व मादक पेये विक्रीवर बंदी असून, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली.

18 ते 20 जून 2025 दरम्यान परिमंडळ-05 अंतर्गत येणाऱ्या दादर, शिवाजीपार्क, माहिम, शाहूनगर, धारावी, कुर्ला आणि विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या कलम 77 अन्वये, 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एकूण 8 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याच मोहिमेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने 100 मीटर परिसरातील 56 पानटपऱ्यांवर निष्कासन आणि जप्ती कारवाई करण्यात आली. यामध्ये दादरमध्ये 3, शिवाजीपार्कमध्ये 4, माहिममध्ये 5, शाहूनगरमध्ये 10, धारावीमध्ये 13, कुर्लामध्ये 5 तर विनोबा भावे नगर परिसरात सर्वाधिक 16 पानटपऱ्यांचा समावेश आहे.शिवाय, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोप्टा (COTPA) कायद्यान्वये एकूण 111 कारवाया या कालावधीत करण्यात आल्या.ही मोहीम विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असून, पोलिसांच्या या कारवाईमुळे पालकवर्ग आणि शैक्षणिक संस्था सुटकेचा निःश्वास टाकत आहेत.

पोलीस आयुक्त बृहन्मुंबई देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (का व सू) बृहन्मुंबई सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त म.प्रा.वि. मुंबई विनायक देशमाने, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 05 गणेश गावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दादर विभाग प्रविण तेजाळे, सहाय्यक पोलीस आयुक्त माहिम विभाग अरूण भोर, सहाय्यक पोलीस आयुक्त कुर्ला विभाग सुर्यकांत बांगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक परिमंडळ-05 मधील सर्व पोलीस ठाणे,पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0