
Mumbai Crime News : परळजवळून अटक, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल; पोलीस करत आहेत अधिक तपास
मुंबई | एका इमारतीतील तीन अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अखेर विकृत सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी परळ रेल्वे स्थानकाजवळून अटक केली आहे. पीडित मुलींनी धाडस करून हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्याने ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीने यापूर्वीही असे प्रकार केले होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. Mumbai Latest Crime News
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी 11 आणि 10 वर्षांच्या तीन अल्पवयीन मुली त्यांच्या राहत्या इमारतीच्या गच्चीवर खेळायला गेल्या होत्या. त्याचवेळी इमारतीचा सुरक्षा रक्षक तिथे हजर होता. त्याने मुलींसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत अश्लील स्पर्श केल्याची तक्रार आहे. या प्रकारानंतर एका पीडित मुलीने घाबरून घरी येऊन आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर इतर मुलींसोबतही असेच गैरवर्तन झाल्याचे समोर आले.
मुलींच्या कुटुंबियांनी तात्काळ स्थानिक भोईवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय न्याय संहिता कलम ७४ (विनयभंग) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायदा 8 व 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवत परळ रेल्वे स्थानकाजवळून आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपी ठाण्यातील दिवा परिसरातील रहिवासी असून, तो त्याच इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने यापूर्वीही असे प्रकार केले होते का, या दिशेने तपास सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.



