Mumbai Crime News : सायबर पोलीस ठाणे, उत्तर विभाग, गुन्हे शाखा, मुंबई यांची कारवाई ; हेवी डिपॉझिट वर घर देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
घर खरेदी/विक्री/भाडेतत्व यासंदर्भातील इंटरनेटवरील वेबसाईटव्दारे इस्टेट एजंट असल्याची जाहिरात करून लाखो रूपयांचा अपहार करणाऱ्या सराईत सायबर गुन्हेगारांची टोळीस अटक
मुंबई :- घर खरेदी विक्री व नंतर ती भाडेतत्वावर देण्याच्या गुंतवणूकीकरीता वेबसाईटवरील ‘मीरारोड परिसरात हेवी डिपॉझिटवर फ्लॅट’ या ‘ग्लोबल्स होम बेस्ट सर्विस’ ची जाहिरात पाहून त्यामध्ये इस्टेट एजंट च्या दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क केला असता, यातील आरोपी व त्याचे साथीदार यांनी फिर्यादी यांना ते इस्टेट एजंट आहेत असे भासवून व फिर्यादीस मीरारोड, वसई, नालासोपारा परिसरातील वेगवेगळया फ्लॅटचे फोटो व्हॉटसअपव्दारे पाठवून हेवी डिपॉझिट साठी व्यवहाराची रक्कम विविध बँक खाती भरती करण्यास भाग पाडले. तसेच सदर गुन्हयातील सायबर आरोपींनी स्वतः फ्लॅटचे मालक, भाडेकरू असल्याचा बनाव करून सदरची रक्कम स्वतःव्या व इतरांच्या नावे असलेल्या बैंक खाती स्विकारून फिर्यादी यांची एकूण 22 लाख 31हजारची फसवणूक केली.
फिर्यादी यांनी (7 मार्च) रोजी कांदिवली, मुंबई येथे राहणारे फिर्यादी यांच्या तक्रारीवरून कलम 120 (बी), 419,420,465,467,471 भा.द.वि सह कलम 66 (क), 66 (ड) अन्वये नोंद करण्यात आला आहे.त्यादृष्टीने गुन्हयाचा सखोल तांत्रिक तपास केला असता गुन्हयातील आरोपी हे नालासोपारा, वसई परिसरात आपला ठावठिकाणा बदलून आपले अस्तित्व लपवून वास्तव्यास असल्याचे निष्पण्ण झाल्याने तपास पथकाने सदर परिसरात पाहिजे आरोपीतांचा अथक शोध घेवून सदर गुन्हयातील सक्रिय मुख्य आरोपीतांना अटक केले.
नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे,
1) हौशिला उर्फ शिवा शिवकुमार शुक्ला, (27 वर्षे),
2) योगेश दुलेराय करवट, (55 वर्षे),
3) विशाल राजनाथ यादव (29 वर्षे),
अटक आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये असे निदर्शनास आले की, त्यांनी इस्टेट एजंट, घर मालक असल्याचा बनाव करून इंटरनेटवरील नामांकित वेबसाईटवर घर, फ्लॅट खरेदी विक्री/भाडेतत्व संदर्भात जाहिरात प्रदर्शित करून सर्वसामान्य लोकांच्या संपर्कात येवून घर, फ्लॅट खरेदी विक्री/भाडेतत्व व्यवहाराच्या बहाण्याने विविध बैंक खाती रक्कम भरणा करण्यास भाग पाडून लाखो रूपयांचा अपहार करणारे सराईत आरोपी आहेत.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशीकुमार मीना, पोलीस उप आयुक्त, दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त आबुराव सोनावणे, प्रकटीकरण पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण आहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाचांगणे, पोलीस उपनिरीक्षक अमोल कांबळे, पोलीस हवालदार नलावडे, सावंत,पावस्कर, परब, वसईकर, पोलीस शिपाई हबीब सय्यद यांनी पार पाडली आहे.
पोलीसांकडून नागरिक आवाहन
नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अशा ऑनलाईन फसव्या जाहिरातींना बळी न पडता अथवा त्यांची पडताळणी न करता कोणतेही आर्थिक व्यवहार करून नयेत. हेवी डिपॉझिट करीता व्यवहार करताना संबंधित प्रॉपर्टीची शहानिशा करावी.