मुंबई

Mumbai Bribe News : मंत्रालयात एसीबीचा मोठा ‘धडाका’; मंत्र्यांच्या कार्यालयातून लाचखोर लिपिक जेरबंद! ‘महाभ्रष्ट सरकार’ म्हणत काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल

•मेडिकल लायसन्ससाठी मागितली होती 50 हजारांची लाच; मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर कारवाई झाल्याने खळबळ; हर्षवर्धन सपकाळ यांनी मागितला मंत्र्यांचा राजीनामा

मुंबई | मुंबईतील मंत्रालय परिसरात आज भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला रंगेहात अटक केली. एका निलंबित मेडिकल स्टोअरचा परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती. विशेष म्हणजे, ही कारवाई एका मंत्र्यांच्या कार्यालयात झाल्याने मंत्रालयातील सुरक्षिततेवर आणि पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेमकी घटना काय?

तक्रारदाराच्या मेडिकलचा परवाना काही कारणास्तव निलंबित करण्यात आला होता. हा परवाना पूर्ववत करून देण्यासाठी राजेंद्र ढेरंगे याने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 35 हजार रुपये देण्याचे ठरले. मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ढेरंगेला झडप घालून ताब्यात घेतले.

नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात तपास

मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईदरम्यान एसीबीचे सहा अधिकारी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात पोहोचले होते. काही काळासाठी हे कार्यालय पूर्णपणे ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली. संबंधित लिपिकाला ताब्यात घेतल्यानंतरच कार्यालयाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. मंत्र्यांच्या दालनात अशा प्रकारे लाचखोरीचे व्यवहार होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

“ही भ्रष्टयुती आहे!”; काँग्रेस आक्रमक

या घटनेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. “महाभ्रष्ट महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात आता खुलेआम लिलाव सुरू झाला आहे. कॅबिनेट मंत्र्यांच्या कार्यालयात लाच घेतली जाते, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. पैशाशिवाय सामान्य जनतेची कामे होत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे,” असे सपकाळ म्हणाले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्र्याला पदावरून हटवावे, अशी मागणीही त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0