भाजपा भ्रष्टाचा-यांचा पक्ष ; खासदार संजय राऊत
Sanjay Raut Target BJP : आमदार खासदार मोठमोठे नेतेमंडळी यांना खरेदी करण्याचे काम भाजपाने चालू केले आहे ; संजय राऊत यांचे गंभीर टीका
मुंबई :- आमदार, खासदार खरेदी करण्याचा धंदा भाजपने सुरू केला आहे. दोन वर्षात सर्व भ्रष्टाचारी भाजपात गेले अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत भाजपविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. तर सकाळी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशच्या चौकशीची मागणी करणारे पत्र मोदींना लिहिले आहे. यावरही त्यांनी भाष्य केले.
भाजप हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष पंतप्रधान मोदी यांच्यवर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, “देशातील भ्रष्टाचार समूळ नष्ट करणार अशी मोदींनी 2014 पासून गॅरंटी घेतली आहे. आता नव्याने गॅरंटी देत आहेत. मागच्या दीड ते दोन वर्षात देशातले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेतले. भाजपा हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष बनला. तरीही भ्रष्टाचार संपवू हे तुणतुणं मोदी आणि भाजपाचे लोक वाजवत आहेत. हे सगळं खरंतर ढोंग आहे”, असे राऊत म्हणाले. तसेच हे सर्व असे असले तरीही आम्ही पंतप्रधानांवर विश्वास ठेवतो. कार्यवाह पंतप्रधान असले तरीही आमचा विश्वास आहे असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
निवडणूक रोखे घोटाळा भयंकर
निवडणूक रोखे घोटाळ्यावरून देखील राऊतांनी टीका केली आहे. “भारतातील निवडणूक रोखे घोटाळा हा जगातला सर्वात मोठा आणि भयंकर घोटाळा आहे. सरकारचा दबाव, त्यांनी दाखवलेली लालुच, कॉर्पोरेट कंपन्या, ठेकेदार, दारुवाले, औषधं बनवणाऱ्या कंपन्या यांना हजारो कोटींची कामं द्यायची आणि रोखे माध्यमातून पैसे गोळा करायचे. आमदार, खासदार खरेदी करायचे हा धंदा भाजपाने सुरू केला आहे. कोणत्याही व्यवहारांमध्ये पारदर्शकता नाही” असाही आरोप संजय राऊत यांनी केला.
500 कोटींचा घोटाळा यावेळी राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या खात्यात गेल्या काही वर्षांमध्ये 40 ते 50 लाखांची उलाढाल झाली आहे पण गेल्या दीड वर्षात त्यातली उलाढाल कोट्यवधींची आहे. एकूण 500 कोटींचा हा घोटाळा आहे. हे सगळे पैसे कुठून आले, दानशूर कर्णाचे अवतार कोण आहेत हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे” असंही संजय राऊत म्हणाले आहे.
संजय राऊतांची पंतप्रधानांकडे पत्राद्ववारे मागणी यासंदर्भातील पत्र संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे, “चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्र राज्यातदेखील सुरू आहे. त्याखेळाचे सूत्रधार आहेत मिंधेसरकारचे बाळराजे! सामाजिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहेत. धर्मादाय आयुक्त हिशोब द्यायाला तयार नाहीत. पैसै देणारे कोण आहेत”, असा सवाल कॅप्शनमध्ये राऊतांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राऊतांच्या या मागणीमुळे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.