Raigad Bribe News : जलजीवन योजनेच्या बिलासाठी लाच; जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी आणि खाजगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात

• 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तिघे रंगेहाथ पकडले; रायगड लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई
रायगड :- जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे बिल काढण्यासाठी लाच मागणाऱ्या तिघांना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेतील वित्त विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
या प्रकरणी लोकसेवक दिलीप कावजी, जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायक (लेखा व वित्त विभाग) आशिष कांबळे आणि खाजगी इसम विलास ढेबे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पेण तालुक्यातील शेणे गावात 2022-23 मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी योजना मंजूर झाली होती. या योजनेचे काम पूर्ण केल्यानंतर ठेकेदार कंपनीला शेवटचे 69 लाख रुपयांचे बिल काढायचे होते. मात्र, हे बिल मंजूर करण्यासाठी वित्त विभागाने अडवणूक सुरू केली होती.
तक्रारदाराने वारंवार पाठपुरावा केला असता, 22 ऑगस्ट रोजी लोकसेवक दिलीप कावजी यांनी 35 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर 25 हजार रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले.
या लाच मागणीबाबत तक्रारदाराने रायगड एसीबीकडे तक्रार दाखल केली. पडताळणीमध्ये लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, दिलीप कावजी यांनी लाचेची रक्कम स्वीकारून ती वित्त विभागातील आशिष कांबळे यांच्याकडे दिली. कांबळे यांनी ती रक्कम खाजगी व्यक्ती विलास ढेबेकडे सुपूर्द केली. त्याचवेळी, एसीबीच्या पथकाने तिघांनाही रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले, पोलीस निरीक्षक निशांत धनावडे, नारायण सरोदे आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईत सहाय्यक फौजदार विनोद जाधव, अरुण करकरे, सुषमा राऊळ, पोलीस हवालदार महेश पाटील, परम ठाकूर, सुमित पाटील, सचिन आटपाडकर, मोनिका मोरे, मोमाली पाटील, सागर पाटील आणि घरत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


