Maharashtra Politics : ठाकरे गटाला सायनमध्ये धक्का, माजी नगरसेवक शिंदे गटात

• प्रतिक्षानगरमध्ये तणाव, शिवसैनिकांची आक्रमक भूमिका; उद्धव ठाकरेंनी साधला संवाद
मुंबई :- शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायन कोळीवाडा परिसरात माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्रतिक्षानगर येथील शिवसेना शाखेवर गर्दी केली. शाखेच्या प्रवेशद्वारावरील कांबळे यांच्या प्रतिमेला काळं फासून कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांपेक्षा कार्यकर्तेच ‘किंग मेकर’ आहेत, असा विश्वास कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला.
सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 173 चे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला.सायन-कोळीवाड्यासारख्या शिवसेनेच्या पारंपरिक गडातील हा दुसरा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी माजी आमदार मंगेश सातमकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे येथील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कांबळे यांच्या प्रवेशाची बातमी कळताच काल सकाळपासूनच मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे शिवसैनिक प्रतिक्षानगर येथील शाखेत जमा झाले.
यावेळी खासदार अनिल देसाई शाखेत उपस्थित होते आणि त्यांच्या फोनवरून उद्धव ठाकरे यांनी जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधून त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. ‘नगरसेवक गेले असले तरी कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत,’ असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी ठाकरेंना दिला. ‘आम्हीच किंग मेकर आहोत, तुम्ही जो उमेदवार द्याल त्याला निवडून आणू,’ असे आश्वासनही कार्यकर्त्यांनी दिले. या घडामोडींमुळे सायन कोळीवाडा परिसरातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.


