Maharashtra Politics : शिवसेना-आंबेडकर युती: नवा राजकीय समीकरण की आंबेडकरी मतांचे विभाजन?

•Eknath Shinde & Anandraj Ambedkar Together प्रकाश आंबेडकरांचा आरोप — ही युती फुले-शाहू-आंबेडकर विचारांची प्रतारणा; आंबेडकरी चळवळीशी द्रोह
मुंबई :- मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय गणिते बदलण्याचे संकेत मिळत असताना, रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत अटीविना युती जाहीर केली आहे. ही घोषणा बुधवारी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन केली.
“ही युती केवळ निवडणूकासाठी नाही, तर विचार आणि विश्वासावर आधारित आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आनंदराज आंबेडकर यांनी याला दुजोरा देत, “कुठल्याही अटींशिवाय ही युती केली आहे,” असे नमूद केले.
मात्र या युतीमुळे आंबेडकरी समाजातच मतविभाजनाचे वारे वाहू लागले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून, “ही युती म्हणजे फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा अपमान असून, दलित-आदिवासी-मुस्लीमांच्या हक्कांशी विश्वासघात आहे,” असे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
राज्याच्या राजकारणात आंबेडकरी नेत्यांची विविध दिशांना वाटचाल सुरू आहे. जोगेंद्र कवाडे यांची युती आधीच शिंदे सेनेसोबत आहे, तर रामदास आठवले भाजपसोबत, आणि प्रा. अर्जुन डांगळे हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. अशा स्थितीत आनंदराज आंबेडकरांची भूमिका शिंदे गटासाठी नैतिक पाठबळ ठरू शकते, पण निवडणूक परिणामांवर किती प्रभाव पडतो हे येणारा काळच ठरवेल.



