
PM Modi Birthday Wishes Latest News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून व्यक्त केली कृतज्ञता
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस असून, त्यांनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोदींच्या संभाव्य निवृत्तीच्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला असून, आगामी काळातही नरेंद्र मोदीच भाजपचे नेते असतील, यावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्रात ‘मोदीमय’ वातावरण
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्रात ‘मोदीमय’ वातावरण दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये विशेष लेख लिहून मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांनी तर सर्व प्रमुख दैनिकांमध्ये मोदींच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण पानाची जाहिरात दिली आहे.
याशिवाय, भाजपच्या अनेक नेत्यांनी ‘माय मोदी स्टोरी’ या मोहिमेअंतर्गत मोदींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, पंतप्रधान मोदी हे निवृत्त होणार नसून यापुढेही तेच आमचे नेते असतील, असा संदेश स्थानिक नेत्यांनी दिला आहे.
नेत्यांच्या लेखातून कृतज्ञता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दैनिकात ‘राष्ट्रहितासाठी सदैव तत्पर कर्मयोगी नेता’ या मथळ्याखाली लेख लिहिला आहे. यात त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली देश गरीब कल्याणासह सुधारणांच्या नव्या वाटेवर स्वार झाल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकसत्ता’मध्ये ‘जनतेचा नेता, जगाचा आदर्श’ या शीर्षकाखाली लेख लिहिला आहे. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मोदी यांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे शिंदे यांनी या लेखातून सांगितले आहे.


