
Mahad Chavdar Tale Latest News : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थितीत ऐतिहासिक सोहळा संपन्न; रायगड पोलिसांकडून महामानवाला 21 जणांची मानवंदना
महाड (रायगड) :- अखिल मानवजातीला सामाजिक समता आणि मानवी हक्कांचा संदेश देणाऱ्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा आज 99 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. 20 मार्च 1927 रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या भूमीत पाण्याचा सत्याग्रह करून विषमतेच्या भिंती तोडल्या होत्या. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून आज महाडमध्ये लाखो भीमसैनिक आणि अनुयायांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय सोहळा दिमाखात पार पडला.
सकाळी साडेआठ वाजता चवदार तळ्याच्या पवित्र प्रांगणात रायगड पोलीस दलातर्फे 21 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस सलामी देऊन मानवंदना दिली. या प्रसंगी राज्याचे मंत्री संजय शिरसाठ आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासह विविध शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.




मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांची उपस्थिती होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचे महाडमध्ये आगमन झाले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चवदार तळ्याच्या स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून महामानवाच्या कार्याला विनम्र अभिवादन केले. त्यांच्यासोबतच राज्याच्या मंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे हे देखील या सोहळ्यात सहभागी झाले होते.
शताब्दी वर्षाकडे वाटचाल
पुढील वर्षी या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष (100 वर्षे) साजरे होणार असल्याने, यंदाच्या 99 व्या वर्षाच्या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी चवदार तळे परिसराच्या विकास आराखड्याबाबत सुतोवाच केले. प्रशासनाने अनुयायांच्या सुविधेसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. महाडमधील सर्व रस्ते निळ्या निशाणांनी सजले असून, भीमप्रेमींच्या ‘जय भीम’च्या घोषणांनी संपूर्ण महाड शहर दुमदुमून गेले होते.



