म.. म.. म… मराठीचा….मराठी भाषा गौरव दिन

कुसुमाग्रज यांचा जन्मदिन
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी, 2013 रोजी घेण्यात आला. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. मराठीचा सन्मान वाढविण्यात ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले, ज्यात ‘विवेकसिंधू’ हे मराठी भाषेतील पहिले ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज यांचे आणि मराठी भाषेला सर्वप्रथम सन 1965 मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण केले जाते.
अनेक वेळा सर्व सामान्य माणसाकडून ‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘मराठी भाषा दिवस’ याची गफलत केली जाते. ‘मराठी भाषा गौरव दिवस’ (27 फेब्रुवारी) आणि ‘मराठी राजभाषा दिवस’ (1 मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे.
1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र हे विशेषतः मराठी भाषिकांचे राज्य असल्याने “1 मे” दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून सन 1965 पासून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय वसंंतराव नाईक सरकारने केला. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी ‘मराठी राजभाषा अधिनियम 1964’ सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला. सन 1966 पासून तो अंमलात आला होते.
मराठी ही राजभाषा
लोकांकडून जेव्हा एखादी भाषा अधिक प्रमाणात बोलीभाषा म्हणून वापरली जाते तेव्हा भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 347 नुसार राजभाषा मान्यता देण्याची तरतूद आणि अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. मराठी भाषेचे उत्तम ज्ञान आणि त्यातील गोडीचे साहित्य क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान कवी कुसुमाग्रज यांनी दिले आहे आणि म्हणूनच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त असणाऱ्या कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन म्हणून 21 जानेवारी, 2013 रोजी त्यांचा वाढदिवस अर्थात 27 फेब्रुवारी हा दिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात यावा अशी घोषणा करण्यात आली.