Sangli News : सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का! जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजपच्या वाटेवर

•भाजपच्या ‘डिनर डिप्लोमसी’ने चर्चांना उधाण; रवींद्र चव्हाण यांच्या भेटीनंतर पक्षप्रवेश निश्चित
सांगली :- सांगलीच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी रात्री पृथ्वीराज पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि डिनर डिप्लोमसीद्वारे त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले. या भेटीनंतर लवकरच पृथ्वीराज पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी घोषणा करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या राजकारणात जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. आता पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि इतर नेत्यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा केली. या चर्चेनंतर पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीच्या विकासासाठी भाजपमध्ये जात असल्याची भूमिका स्पष्ट केली.
उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश
रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर येऊन जाहीर केले की, पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. ते बुधवारी (13 ऑगस्ट) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि माजी नगरसेवकही भाजपमध्ये सामील होतील, अशी माहिती देण्यात आली आहे. या घडामोडीमुळे सांगलीतील काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, आगामी काळात येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.



