Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र — “शिष्यवृत्ती थांबली, वसतिगृहांची अवस्था दयनीय”

Rahul Gandhi On PM Modi : दरभंगा वसतिगृहातील वास्तव पाहून राहुल गांधी अस्वस्थ – 6 विद्यार्थी एका खोलीत, शौचालयाची भयानक स्थिती”
ANI – लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी शिक्षणव्यवस्थेतील असमानता आणि दलित, ओबीसी, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या समस्या अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांना थेट पत्र लिहिले आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात नमूद केले की बिहारमधील दरभंगा येथील आंबेडकर वसतिगृहात विद्यार्थ्यांना अत्यंत वाईट स्थितीत राहावं लागत आहे. ते म्हणाले, “एका खोलीत सहा-सात विद्यार्थी राहतात, शौचालये अस्वच्छ आहेत, स्वच्छ पाणी आणि योग्य जेवणाचीही व्यवस्था नाही.”
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीबाबतही गंभीर तक्रारी केल्या. राहुल गांधी म्हणाले, “बिहारमध्ये शिष्यवृत्ती पोर्टल तीन वर्षांपासून बंद आहे आणि 2021-22 मध्ये एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाली नाही. 2023 मध्ये 1.26 लाख दलित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती, जी 2024 मध्ये 0.69 लाखांवर आली.”
दलित, ओबीसी, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती निम्म्यावर – केंद्र सरकारच्या दुर्लक्षावर टीका
राहुल गांधी यांनी पत्रातून केंद्र सरकारकडे दोन तातडीच्या पावलांची मागणी केली – वसतिगृहांची स्थिती सुधारावी आणि शिष्यवृत्ती वितरणात कोणताही विलंब होऊ नये.
“जोपर्यंत खालच्या स्तरातील तरुण शिक्षणाच्या प्रवाहात येत नाहीत, तोपर्यंत भारताची प्रगती शक्य नाही,” अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
राहुल गांधी 15 मे रोजी बिहारमधील दरभंगा येथे पोहोचले होते. तिथे आंबेडकर वसतिगृहात ‘शिक्षा न्याय संवाद’ कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले होते, ‘या देशातील 90 टक्के लोकसंख्येसाठी कोणताही मार्ग नाही. वरिष्ठ नोकरशाहीतील तुमचे लोक शून्य आहेत, डॉक्टरांमध्ये तुमचे किती लोक आहेत, शिक्षण व्यवस्थेत तुमचे किती लोक आहेत, जर तुम्ही वैद्यकीय व्यवस्थेच्या मालकांकडे पाहिले तर ते शून्य आहेत.’



