Lalbaugcha Raja : उद्योगपती अनंत अंबानींच्या खांद्यांवर लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाची मोठी जबाबदारी
•अनंत अंबानींला लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाच्या ‘या’ पदावर नियुक्ती
मुंबई :- मुंबईतील लालबागचा राजा हा गणपती मुळात कोळ्यांचा गणपती म्हणून प्रसिद्ध होता. कोळी बांधवांनीच या गणपतीची सुरुवात केली असं सांगितलं जातं. यंदाच्या वर्षी हे गणेश उत्सव मंडळ 91 वं वर्ष साजरा करत असून, दरवर्षीप्रमाणं यंदाही बाप्पासाठी सुरेख आरास आणि भव्य मंडपाची उभारणी करत इथं येणाऱ्या आहे.
देशभरातील गणेश भक्तांच्या आकर्षक असलेल्या लालबागचा राजा या गणेश उत्सव मंडळाची लगबग आता अंतिम टप्प्यात आली आहे. कारण, गणेश चतुर्थीसाठी आता अवघे काही तास उरले आहेत. दरवर्षीप्रमाणं यंदाही लालबागचा राजाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची हजेरी असणार असून, त्याच धर्तीवर या गणेश उत्सव मंडळाची तयारी सुरू आहे. यादरम्यानच या मंडळामध्ये एका महत्त्वाच्या पदी, उद्योगपती आणि रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांचाही प्रवेश झाला आहे.
अनंत अंबानींवर लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जवळपास महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंडळातील पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय एकमतानं घेतल्याचं सांगण्यात आलं. अनंत अंबानींवर या मंडळाच्या वतीनं मानद सदस्य म्हणून जबाबजदारी सोपवण्यात आली आहे. अंबानी कुटुंबाची एकंदर धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत हा निर्णय घेण्यात आल्याचं समजत आहे. लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाप्रती अंबानी कुटुंबाची आत्मियता आणि त्यांचा सेवाभाव यामुशं मंडळाच्या प्रगतीलाही वाव मिळाला असून, त्यामुळंही मंडळात अनंतच्या नावाचा समावेश करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.