Rohit Pawar : राष्ट्रवादीत नेतृत्वबदलानंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया: “जी जबाबदारी मिळेल, ती पार पाडणारच”

Rohit Pawar On Shashikant Shinde : शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड; रोहित पवार यांचा पक्षावर विश्वास – ‘पदासाठी इच्छुक नव्हतो, कार्यकर्त्यांसोबत लढत राहीन’
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये नुकत्याच झालेल्या नेतृत्वबदलानंतर पक्षाचे युवा आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी आपली पहिली ठाम प्रतिक्रिया दिली आहे. “मी कोणत्याही पदासाठी इच्छुक नव्हतो आणि माझ्या नावाची कोणतीही चर्चा नव्हती,” असे स्पष्ट करत त्यांनी पक्षश्रेष्ठींकडून जी जबाबदारी देण्यात येईल, ती मनापासून पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
नेतृत्वबदलाच्या पार्श्वभूमीवर, जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड झाली. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, “शशिकांत शिंदे हे अनुभवी नेते आहेत. त्यांनी निश्चितच उत्कृष्ट कामगिरी करावी, अशी आम्हा सर्वांची अपेक्षा आहे. जयंत पाटील यांनी गेल्या सात वर्षांमध्ये प्रचंड मेहनत घेतली. त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे.”
प्रदेशाध्यक्षपदासाठी माझ्या नावाची कोणतीही चर्चा नव्हती आणि मी इच्छुकही नव्हतो,” असं ते म्हणाले. “मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जी जबाबदारी दिली जाईल, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करेन. लोकांच्या मनातील खदखद, त्यांची अडचण, हे सगळं विधिमंडळात पोचवणं आणि सरकारवर दबाव टाकून त्यावर तोडगा काढणं, हेच आमचं काम आहे.”
रामदास आठवले यांच्या जयंत पाटील यांच्याविषयीच्या कवितेच्या भाष्याबाबत विचारल्यावर रोहित पवार म्हणाले, “आठवले मोठे नेते आहेत. त्यांच्या कविता चर्चेत राहतात, पण त्या कविता प्रत्यक्षात कृतीत उतरतीलच, असं नाही. जयंत पाटील हे लढवय्ये नेते आहेत. त्यांनी पक्षासाठी मोठे त्याग केले आहेत. ते कोणाच्याही बोलण्यावर निर्णय घेणारे नाहीत. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करत राहू.”


