Ketaki Chitale Post : वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळे यांची पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट
•अभिनेत्री केतकी चितळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत वादग्रस्त टीका
मुंबई :- केतकी चितळेने एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. आता सध्या तिने उद्धव ठाकरे यांच्याविषयीची एक वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारात 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी दिसल्याचा आरोप भाजपने केला होता. आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा अमोल कीर्तीकर यांच्या समर्थनार्थ आणि प्रचारार्थ फिरतांना दिसत असल्याचा आरोप भाजपने केला.
केतकी चितळे काय पोस्ट शेअर केली?
केतकीने तिच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर ही पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, ‘ठाकरे तुम्हाला लाज कशी वाटत नाही? लकी पेट्रोल पंप उडाला (जो आम्हाला त्यावेळी ट्रकचे टायर फुटले असावे वाटले आवाज ऐकून) त्यातील आरोपीला स्टार प्रचारक म्हणून मिरवत आहात? तसेही मी कीर्तीकरांना मत देणार नव्हतेच, पण आज बाळासाहेबांमुळे जो काही 0.0001 टक्के आदर मनात होता तुमच्याविषयी, तोही तुम्ही मातीत मिळवण्यात यशस्वी झालात. राग, चीड, द्वेष, संताप अशा भावना देखील मनात येत नाहीत; आता मनात तुमच्याविषयी येते, ती फक्त कीव.’
केतकीने काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर केतकीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. केतकीने शरद पवार यांच्यावर टीका करणारी एक कविता तिच्या फेसबुकवरुन शेअर केली होती. त्यानंतर आता केतकीने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळत आहे.