मुंबई

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसचा ‘स्वबळा’चा नारा! 122 जागांवर लढणार; ‘आप’च्या 50 कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश

•”कोणी पक्ष सोडून गेले तरी फरक पडत नाही”; सचिन पोटेंच्या राजीनाम्यानंतर जिल्हाध्यक्ष राजा पातकरांचा पलटवार

कल्याण | आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली कंबर कसली असून, कोणत्याही युतीशिवाय स्वबळावर निवडणूक लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. “काँग्रेस सर्वच्या सर्व 122 जागांवर पूर्ण ताकदीने लढेल आणि आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील,” असा ठाम विश्वास काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांनी व्यक्त केला. यावेळेस ‘आम आदमी पक्षा’च्या 50 कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचे बळ वाढले आहे.

सचिन पोटेंच्या राजीनाम्यावर टीका

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन पोटे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांच्या या निर्णयावर नाव न घेता राजा पातकर यांनी टीका केली. “काँग्रेस हा सर्वात जुना आणि वटवृक्षासारखा पक्ष आहे. आपल्या कार्यकाळात पक्षाने अनेक नेत्यांची ये-जा पाहिली आहे. ज्यांना पक्षाने खूप काही दिले, ते सोडून गेले तरी पक्षाला कोणताही फरक पडणार नाही. आम्ही त्यांच्या जागी नवीन आणि उत्साही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत,” असे पातकर यांनी स्पष्ट केले.

भाजपमधील ‘अस्वस्थ’ काँग्रेसच्या वाटेवर?

प्रदेश उपाध्यक्ष राजन भोसले यांनी यावेळी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला. “भारतीय जनता पक्षातील काही अस्वस्थ नेते आणि पदाधिकारी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. आम्ही त्यांच्या नावांचा विचार करत असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल,” असे ते म्हणाले. 122 प्रभागांमध्ये तुल्यबळ उमेदवार देण्यावर काँग्रेसचा भर असेल, असेही त्यांनी नमूद केले.

25 वर्षांच्या सत्तेचा हिशोब मागणार
कल्याण-डोंबिवलीत गेल्या 25 वर्षांपासून भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, या काळात शहराचा विकास न होता केवळ टेंडर आणि टक्केवारीचे राजकारण झाल्याचा आरोप महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी केला. “शहरे वाहतूक कोंडीत अडकली आहेत, रस्ते आणि पुलांची दुरवस्था झाली आहे. नागरिकांच्या तक्रारींकडे कोणाचेही लक्ष नाही. या अस्वस्थतेचा फायदा काँग्रेसला निवडणुकीत नक्कीच होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ कार्यकर्त्यांची नाराजी

कार्यक्रमादरम्यान एक वेगळाच पेच पाहायला मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मामा पगारे यांना व्यासपीठावर स्थान न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. “आपल्या वयाएवढीच पक्षाची सेवा करूनही डावलले जाणे दुर्दैवी आहे. स्थानिक पातळीवर राहुल गांधींच्या विचारांप्रमाणे काम झाले, तरच पक्षाला भविष्य आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0