Mumbai Police News : मुंबई पोलिसांचे घराचे स्वप्न होणार साकार; ‘कॅान्स्टेबल म्हणून रुजू होताच 500 चौ. फुटांचे घर मिळेल’- पोलीस आयुक्त देवेन भारती

‘पोलीस कुटुंबांचा त्याग मोठा’; गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात आयुक्तांची मोठी घोषणा
मुंबई :- पोलीस कर्मचाऱ्यांना भेडसावणारी घराची समस्या दूर करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. पोलीस दलात कॅान्स्टेबल म्हणून रुजू होताच प्रत्येक पोलिसाला मुंबईतच 500 चौरस फुटांचे घर उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी जाहीर केले आहे. या घोषणेमुळे अनेक वर्षांपासून छोट्या घरात राहणाऱ्या पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पोलीस कुटुंबांचा त्याग महत्त्वाचा
जन सहयोग फाऊंडेशनतर्फे आयोजित पोलिसांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना आयुक्त भारती म्हणाले की, पोलीस २४ तास सेवेत तत्पर असतात. त्यामुळे त्यांना कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. ‘पोलिस कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने त्यांचे कुटुंबीयही खडतर परिस्थितीला तोंड देतात, त्यांचा त्याग खूप मोठा आहे,’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले. अनेक पोलीस कर्मचारी कल्याण-डोंबिवलीसारख्या दूरच्या भागांतून रोज मुंबईत ये-जा करतात. त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी मुंबईतच घराची सोय करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण आणि क्रीडा सुविधांचा विकास
पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी यावेळी पोलिसांच्या मुला-मुलींच्या शैक्षणिक आणि क्रीडा विकासासाठीही अनेक घोषणा केल्या. यापुढे पोलिसांच्या मुलांना शिक्षणात कोणतीही कमतरता भासणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, त्यांच्यातील कौशल्ये वाढवण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. पुढील तीन वर्षांत नायगाव येथे अत्याधुनिक क्रीडा केंद्र आणि ऑलिंपिक दर्जाचा जलतरण तलाव उभारण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
या कार्यक्रमात अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख आणि धनंजय कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘दहावीत चांगले गुण मिळाले म्हणून हुरळून न जाता पुढील वाटचालीत कठोर मेहनत आणि जिद्द कायम ठेवा,’ असा सल्ला धनंजय कुलकर्णी यांनी दिला. तर डॉ. अभिनव देशमुख यांनी मुलांना पालकांच्या त्यागाची आठवण करून दिली, ‘पालकांचे कष्ट आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेरणा देतात,’ असे ते म्हणाले.



