मुंबई

Kalyan Crime News : कल्याणमध्ये दारू माफियांवर पोलिसांचा ‘हातोडा’! 15,000 लिटर रसायनासह 7.50 लाखांचा मुद्देमाल खाक; निवडणूक आचारसंहितेत गुन्हे शाखेची मोठी कारवाई

•वडवली आणि घेसर शिवारात नदीकाठी सुरू होत्या हातभट्ट्या; दोन मुख्य आरोपींसह साथीदारांवर मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल

कल्याण | कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी बेकायदेशीर दारूचा पुरवठा करण्याचे मनसुबे कल्याण गुन्हे शाखेने उधळून लावले आहेत. 10 जानेवारी 2026 रोजी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी धाडी टाकून पोलिसांनी गावठी दारू तयार करण्याचे तब्बल 7 लाख 50 हजार रुपये किमतीचे साहित्य आणि रसायनाचा साठा जागीच नष्ट केला.

कारवाई १: वडवली-शिरढोण नदीकाठी 5 लाखांचा मुद्देमाल नष्ट

गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई गोरक्ष शेकडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, वडवली आणि शिरढोण गावाच्या सीमेवरील नदीकाठी मोकळ्या जागेत झाडाझुडपांचा आडोसा घेऊन हातभट्टी चालवली जात होती. पोलिसांनी तिथे छापा टाकला असता राजेशकुमार रामयशस्वी यादव आणि त्याचे तीन साथीदार रंगेहाथ दारू गाळताना आढळले. तिथे 200 लिटरचे 50 प्लास्टिक ड्रम, ज्यामध्ये 10,000 लिटर कच्चे रसायन (वॉश) होते, ते पोलिसांनी नष्ट केले. याची किंमत 5 लाख रुपये इतकी आहे.

कारवाई 2: घेसर शिवारात वडाच्या झाडाखाली दुसरी भट्टी उद्ध्वस्त

दुसरी कारवाई घेसर गावाच्या शिवारात करण्यात आली. तिथे एका वडाच्या झाडाखाली नंदजी बुद्ध यादव आणि त्याचे साथीदार हातभट्टी चालवत होते. पोलिसांनी तिथून 5,000 लिटर रसायन भरलेले 25 ड्रम जप्त करून नष्ट केले. या साठ्याची किंमत 2 लाख 50 हजार रुपये आहे.
मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल
या दोन्ही प्रकरणांत आरोपींविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अवैद्य धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पथकाची कामगिरी

ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, गुन्हे शाखा उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0