मुंबई

Mumbai Crime News : मुंबई-बीड-नाशिकपर्यंत धागेदोरे! ‘पाजी’सह सराईत घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक

• काशिमिरा पोलिसांची मोठी कारवाई: 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

मीरारोड :- काशिमिरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एका अत्यंत सराईत घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. जगनसिंग तारासिंग कल्याणी ऊर्फ ‘पाजी’ या मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदारास अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल 12 तोळे सोन्याचे दागिने (14.56 लाख) आणि गुन्ह्यात वापरलेली एफ झेड मोटारसायकल असा एकूण 15 लाख 26 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास: सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण

28 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री मीरारोड पूर्वेकडील पेणकरपाडा येथील योगेश म्हात्रे यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याची गंभीर दखल घेत वरिष्ठांनी तातडीने तपास सुरू करण्याचे निर्देश दिले.काशिमिरा गुन्हे प्रकटीकरण शाखेने घटनास्थळावरील आणि आजूबाजूच्या परिसरातील जवळपास 100 ते 125 सीसीटीव्ही फुटेज कसून तपासले. तसेच, तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत या टोळीचे धागेदोरे शोधून काढले.

नाशिक आणि बीड येथून आरोपींना अटक

पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर मुख्य आरोपी जगनसिंग तारासिंग कल्याणी ऊर्फ पाजी (वय 39, मूळ रा. नांदेड) याला नाशिक शहर येथून, तर त्याचा साथीदार हनुमंत बापुराव तांचे (वय 21, रा. पाटोदा, बीड) याला बीड जिल्ह्यातील पाटोदा येथून ताब्यात घेतले.
तपासादरम्यान, आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सराईत गुन्हेगार ‘पाजी’चा इतिहास

आरोपी जगनसिंग कल्याणी ऊर्फ ‘पाजी’ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध ठाणे शहर, मुंबई (मुलुंड), अहमदनगर आणि गुजरात येथील पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या दोन्ही आरोपींच्या अटकेमुळे काशिमिरा पोलीस ठाण्यातील दोन आणि मुंबईतील दहिसर (ज्वेलर्स दुकान फोडी) आणि बीड जिल्ह्यातील अंमळनेर पोलीस ठाण्यातील असे एकूण 4 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक

पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर आयुक्त दत्तात्रय शिंदे, गुन्हे उप-आयुक्त संदीप डोईफोडे आणि सहाय्यक आयुक्त गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी ही कामगिरी पार पाडली. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे, स्वप्निल बेलोसे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने उत्कृष्टरित्या तपास करून या सराईत चोरट्यांना गजाआड केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0