महाराष्ट्र

Nishikant Dubey : संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा जयघोष! मराठी महिला खासदारांनी निशिकांत दुबेंना खडसावले!

•’पटक पटक के मारेंगे’ म्हणणाऱ्या दुबेंची संसदेत पळापळ; ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी दणाणले परिसर

ANI :- मराठी माणसांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी संसदेतच चांगलाच धडा शिकवला आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव यांनी संसदेच्या लॉबीमध्ये दुबे यांना गाठत त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. महिला खासदारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे दुबे यांची चांगलीच भंबेरी उडाली आणि त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. त्यानंतर संसद परिसरात ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेल्याचे वृत्त आहे.

लोकसभेचे कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे स्थगित झाल्यानंतर, मराठी अस्मितेचा अपमान करणाऱ्या निशिकांत दुबे यांना धारेवर धरण्यासाठी वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव या खासदारांनी पुढाकार घेतला. “कसली ही तुमची अर्वाच्च भाषा? मराठी माणसांना मारण्याची भाषा कशी करू शकता? तुम्ही आपटून आपटून कोणाला आणि कसे मारणार आहात? मराठी भाषिकांच्या विरोधातील अरेरावी खपवून घेतली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी दुबे यांना चांगलेच सुनावले.

यावेळी महिला खासदारांनी दुबे यांना पूर्णपणे घेरले होते. ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा सुरू होताच इतरही मराठी खासदार तिथे पोहोचले आणि त्यांनी दुबे यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे निशिकांत दुबे निरुत्तर झाले आणि त्यांना गपगुमान तिथून निघून जावे लागले.

हिंदी भाषेच्या सक्तीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी निशिकांत दुबे यांनी राज ठाकरेंना “आमच्या भागात येऊन दाखवा, पटक पटक के मारेंगे,” असे आव्हान दिले होते, ज्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते. यावर राज ठाकरेंनीही “हिंमत असेल तर तू मुंबईत येऊन दाखव. समंदर में डुबे डुबे के मारेंगे,” असे प्रतिआव्हान दिले होते. “महाराष्ट्रात येऊन कोणीही मराठी व्यक्तीच्या अंगावर आला तर त्याला ठेचायचे, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही,” असे म्हणत राज ठाकरेंनी यापूर्वीच दुबे यांच्यावर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर संसदेतील महिला खासदारांच्या या कृतीने मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0