International Yoga Day : योगाच्या सामर्थ्याचा जागतिक साक्षात्कार! 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरात उत्साहात साजरा

•मोदींच्या उपस्थितीत विशाखापट्टणममध्ये मुख्य कार्यक्रम; लठ्ठपणाविरोधात पुन्हा दिले आव्हान
ANI | आज संपूर्ण भारतासह जगभरात 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित प्रमुख कार्यक्रमात सहभाग घेत योगाभ्यास केला. जगभरातील तणाव, अशांतता आणि अस्थिरतेला सामोरे जात असलेल्या मानवतेसाठी “योग हा शांततेचा मार्ग आहे”, असे स्पष्ट करत त्यांनी योगाच्या जागतिक महत्त्वावर प्रकाश टाकला.

मोदी म्हणाले, “योग हे एक असे बटण आहे, जे मानवाला श्वास घेण्याची, संतुलन राखण्याची आणि नव्या जोमाने जीवनाकडे जाण्याची प्रेरणा देते.” त्यांनी नमूद केले की, संयुक्त राष्ट्रात भारताने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला आणि अवघ्या काही दिवसांत 175 देशांनी त्याला पाठिंबा दिला, ही बाब मानवतेच्या एकजुटीचं उदाहरण आहे.
योग दिनानिमित्त मोदींनी पुन्हा एकदा लठ्ठपणाविरोधात लढा उभारण्याचे आवाहन केले. “संपूर्ण जग लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जात आहे. मी पूर्वीही सांगितलं होतं, आज पुन्हा सांगतो – आपल्या जेवणात 10% तेल कमी करा. आरोग्यास अपायकारक खाद्यपदार्थ टाळा आणि नियमित योग करा – हेच निरोगी जीवनाचे खरं सूत्र आहे,” असा संदेश त्यांनी दिला.



