India VS SA : भारताचा मायदेशात 25 वर्षांतील सर्वात मोठा पराभव! दक्षिण आफ्रिकेने मालिका 2-0 ने जिंकली!

India VS SA Test Match Update : पराभवानंतर प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीकेची झोड; गंभीरकडून ‘राजीनामा’ चर्चेवर थेट भाष्य!
India VS SA Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका भारतीय संघासाठी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 408 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आणि मालिका 2-0 अशा फरकाने खिशात टाकली. 549 धावांचे विशाल आव्हान घेऊन मैदानात उतरलेला भारतीय संघ दुसऱ्या डावात अवघ्या 140 धावांत गारद झाला. धावांचा विचार करता, भारताच्या कसोटी इतिहासातील मायदेशातील हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.
या विजयासह दक्षिण आफ्रिकेने तब्बल 25 वर्षांनंतर भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याचा ऐतिहासिक विक्रम केला आहे. या पराभवामुळे भारताला मायदेशात सलग दुसऱ्या कसोटी मालिकेत ‘व्हाईटवॉश’ स्वीकारावा लागला आहे. यापूर्वी न्यूझीलंडने भारताला 3-0 ने पराभूत केले होते.
पराभवाचे खापर गौतम गंभीर यांच्यावर
भारतीय संघाच्या या लाजिरवाण्या कामगिरीनंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर सोशल मीडिया आणि क्रिकेट जगतातून जोरदार टीका सुरू झाली आहे. गंभीर यांनी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून संघाचा कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्ड चांगला राहिलेला नाही, असा आक्षेप घेत अनेक चाहते गंभीर यांनी तातडीने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आहेत.
गंभीरकडून टीकेला प्रत्युत्तर;’दोष सर्वांचा, सुरुवात माझ्यापासून करा!’
दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर गौतम गंभीर यांनी प्रशिक्षकपदाच्या राजीनाम्याच्या चर्चांवर आणि टीकेवर थेट भाष्य केले आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या ऐतिहासिक पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.
गंभीर म्हणाले, “दोष सर्वांचा आहे, पण त्याची सुरुवात माझ्यापासून करा.”
त्याचबरोबर, त्यांनी आपल्या प्रशिक्षकपदाच्या काळात संघाला मिळालेल्या यशाची आठवण करून दिली. गंभीर म्हणाले, “माझ्या भवितव्याचा निर्णय बीसीसीआय घेईल. पण इंग्लंडमध्येही माझ्या मार्गदर्शनाखाली संघाने चांगला खेळ केला होता, तसेच माझ्या मार्गदर्शनाखाली संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषक ही स्पर्धा जिंकली आहे, हेही लक्षात ठेवा.”
गौतम गंभीर यांच्या या विधानामुळे बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट प्रशासनापुढे पुढील काळात कठोर निर्णय घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे.



