क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Crime News : पुण्यात जिलेटिनच्या कांड्यांचा साठा आढळला!

Pune Latest Crime News : विश्रांतवाडी, टिंगरेनगर परिसरात खळबळ; 138 जिलेटिन कांड्या जप्त, बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल!

पुणे :- पुण्यातील विश्रांतवाडी, टिंगरेनगर येथील विद्यानगर गल्ली क्र. 8 येथील साईकृपा लॉजजवळ बॉम्बमध्ये वापरण्यात येणारे जिलेटिन आणि वायर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसर पिंजून काढला.

स्वच्छता करताना आढळले स्फोटक साहित्य

टिंगरेनगर येथे विद्यानगर आरोग्य कोठीमधील सफाईसेविका स्वच्छतेचे काम करत असताना त्यांना मोकळ्या प्लॉटच्या पत्र्याच्या गेटजवळच्या बाजूला एक पोते रस्त्यावर ठेवलेले दिसले. त्या पोत्यात स्फोटक सदृश्य वस्तू असल्याचे आढळून आले.

याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्परतेने शोध घेतला असता त्या पोत्यात 138 जिलेटिन कांड्या आणि 135 डेटोनेटर वायरसह, एकूण 10 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल सापडला. हे साहित्य प्रामुख्याने खडक फोडण्यासाठी वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले.

बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल

हे धोकादायक साहित्य हलगर्जीपणाने लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने ठेवल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे साहित्य एका बांधकाम व्यावसायिकाचे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी राहुल सुदाम वाजे आणि किसन धनवते (दोघेही रा. शिरूर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार यशवंत किरवे यांनी फिर्याद दिली आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यांनी हा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील तपासणी केली आहे.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल माने करत आहेत. नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, मात्र नागरिकांनी अशा संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन मंगेश हांडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0