Kishori Pednekar : मुंबई महापालिकेत ठाकरेंची ‘आक्रमक’ खेळी! माजी महापौर किशोरी पेडणेकर गटनेतेपदी; ‘मातोश्री’चा निष्ठावंतांना मोठा सन्मान

•उद्या निघणाऱ्या महापौरपदाच्या आरक्षणापूर्वी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी पूर्ण; मनसे, काँग्रेसनेही आपापले गटनेते केले जाहीर
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनंतर आता सत्तेच्या राजकारणाला नवी धार आली आहे. उद्या, 22 जानेवारी रोजी मंत्रालयात निघणाऱ्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी महापालिकेत आपापले ‘गड’ सुरक्षित करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या गटनेतेपदाची धुरा सोपवून एक मोठा राजकीय संदेश दिला आहे. 65 नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या ठाकरे गटाने बुधवारी कोकण विभागीय आयुक्तांकडे आपल्या गटाची अधिकृत नोंदणी पूर्ण केली.
निष्ठेचे फळ आणि आक्रमक चेहरा शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर अनेक मातब्बर नगरसेवकांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. मात्र, त्या पडझडीच्या काळातही किशोरी पेडणेकर या ‘मातोश्री’शी एकनिष्ठ राहिल्या. विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला टीव्ही कॅमेऱ्यासमोर आक्रमकपणे उत्तर देणाऱ्या पेडणेकर या केवळ निष्ठावंत कार्यकर्त्या नाहीत, तर त्या आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील अत्यंत प्रभावी नेत्या आहेत. आगामी काळात महापालिकेत सत्ताधारी गटाशी दोन हात करण्यासाठी अशाच आक्रमक नेतृत्वाची गरज ओळखून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे.
इतर पक्षांचीही मोर्चेबांधणी पूर्ण केवळ ठाकरे गटच नाही, तर इतर पक्षांनीही आपापले गटनेते मैदानात उतरवले आहेत. 6 नगरसेवक असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी यशवंत किल्लेदार यांना गटनेते केले आहे. किल्लेदार हे दादरसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघातून निवडून आले असून त्यांचा प्रशासकीय कामाचा अनुभव पक्षासाठी मोलाचा ठरणार आहे. दुसरीकडे, 24 नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या काँग्रेसने कुर्ल्याचे नगरसेवक अश्रफ आजमी यांची गटनेतेपदी निवड केली आहे. भाजपने 89 आणि शिंदे गटाने 29 जागांसह आपली स्वतंत्र रणनीती आखली असून, त्यांच्या गटनेत्यांची नावेही लवकरच अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे.
महापौरपदाचा सस्पेन्स कायम गुरुवारी मंत्रालयात सकाळी 11 वाजता होणारी आरक्षणाची सोडत ही मुंबईच्या नव्या महापौराचे भवितव्य ठरवणार आहे. जर आरक्षण अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी निघाले, तर संपूर्ण मुंबईत केवळ ठाकरे गटाकडेच (जितेंद्र वळवी आणि प्रियदर्शनी ठाकरे) या प्रवर्गाचे नगरसेवक आहेत. अशा स्थितीत भाजप-शिंदे गटाकडे बहुमत असूनही त्यांना ठाकरे गटाच्या अटी मान्य कराव्या लागतील किंवा पाठिंबा द्यावा लागेल. यामुळेच, गटनेते पदाची निवड करताना सर्व पक्षांनी कमालीची गुप्तता पाळली होती. मुंबईच्या सत्तेचा खरा खेळ आता उद्याच्या आरक्षण सोडतीनंतरच खऱ्या अर्थाने सुरू होईल.


