Maharashtra Politics : शस्त्र परवाना वाद : योगेश कदम यांची उपमुख्यमंत्री शिंदेंशी भेट, विरोधकांना जशास तसं उत्तर देणार

•’तुमची चूक नसेल तर घाबरू नका’, शिंदे यांचा गृहराज्यमंत्र्यांना सल्ला,विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होताच कदम यांनी ‘ट्विटर’वरून साधला निशाणा
मुंबई :- सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या असून, विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज (शनिवार, 11 ऑक्टोबर) योगेश कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपली बाजू स्पष्ट केली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भेटीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कदम यांना पाठिंबा दिला आहे. “जर तुमची चूक नसेल, तर घाबरून जाण्याचे कारण नाही. विरोधकांना योग्य आणि जशास तसे उत्तर द्या,” असा सल्ला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कदम यांना दिल्याचे समजते. कदम यांचे ट्विटवरून प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर योगेश कदम यांनी तातडीने ‘ट्विटर’ (X) वर पोस्ट करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
2019 पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काहीजण करत आले. तरीसुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, परंतु तेव्हादेखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं, त्यालाच ताकद देण्याचं काम काहीजणांनी केलं. स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काहीजण तेव्हापासूनच करत होते.
पुन्हा 2024 च्या निवडणुकीत माझ्या कुटुंबियांचा स्वतःच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याइतपत राजकारणाची पातळी घसरली गेली. मला पराभूत करण्यासाठी त्यांनी समाज, पैसा आणि जातीच्या आधारावर गलिच्छ राजकारण करण्याचे अनेक प्रकार केले. माझी वैयक्तिक बदनामी करण्याच्या हेतूने माझ्या खाजगी आयुष्यातदेखील ढवळाढवळ करण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला.
तरीदेखील, दुसऱ्यांदा जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले. माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला मंत्रीपद दिले. साहजिकच, ज्यांना मला आमदार म्हणून पाहण्याचीही इच्छा नव्हती, त्यांना मी मंत्री झालो हे कसं बघवणार!
गेल्या सहा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आजवर माझ्यावर कोणीही गुंड किंवा भ्रष्ट प्रवृत्तीचे समर्थन केल्याचे आरोप देखील करू शकले नाहीत. तरीसुद्धा काही ठराविक मंडळी माझी इमेज डॅमेज होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत.
दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याच्या नादात, राजकारणात सक्रिय नसलेल्या माझ्या आईलादेखील या राजकारणात ओढून नीचपणाचा कळस गाठला गेला. व्यक्तीबद्दल मनात असलेला द्वेष काहीजणांना राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर घेऊन येईल, अशी कल्पनादेखील केली नव्हती.
असो, राजकारणात सर्वच गोष्टींचा ‘सामना’ करावा लागतोच. पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही. मी माझं काम, माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत आहे आणि पुढेही तसंच निभावत राहणार आहे.
शेवटी असंच म्हणावं वाटतं की,
“छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही.”- योगेश कदम
सचिन घायवळच्या शस्त्र परवाना प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) आणि इतर विरोधी पक्षांनी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली होती. योगेश कदम यांनी आपल्या या पोस्टच्या माध्यमातून टीकाकारांना उत्तर देत, आपण राजीनामा देणार नसल्याचे आणि या टीकेला तोंड देण्यास सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. राजकीय वर्तुळात या प्रकरणावरून आगामी काळात आणखी वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.


