मुंबई

मस्जिदवरील लाउडस्पीकर वादावर सह्याद्री अतिथिगृहात उच्चस्तरीय बैठक

•उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली धार्मिक संघटनांचे शिष्टमंडळ पोलिसांच्या कारवाईविरोधात उतरले मैदानात

मुंबई | राजधानीतील सह्याद्री अतिथिगृहात आज (25 जून) सकाळी 8.30 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक मस्जिदांवरील लाउडस्पीकरविषयी वाढलेल्या वादग्रस्त कारवाईच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सना मालिक, नवाब मलिक, आमदार जीशान सिद्दीकी, सिद्धार्थ कांबळे, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, एआयएमआयएमचे वारिस पठाण, तसेच राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते.

शिष्टमंडळाचे म्हणणे आहे की, अलिकडच्या काळात पोलिसांकडून काही भागांतील मस्जिदांवर लावलेले लाउडस्पीकर कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात येत आहेत. त्यांच्या मते, उच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण मर्यादा 45 ते 56 डेसिबल निश्चित केली असली, तरी पोलिसांकडून कोणतीही मोजणी न करता सरसकट कारवाई होत आहे. हे पद्धतशीरपणे अन्यायकारक असल्याचा त्यांचा ठाम दावा आहे.

अबू आजमी यांनी या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की, “या मोहिमेचा प्रारंभ सोमय्यांनीच केला आहे. ते मुस्लिमबहुल गोवंडी परिसरात जाऊन पोलीस यंत्रणांवर दबाव आणत आहेत, ज्यामुळे स्थानिक पोलीसही स्पीकर काढण्यास भाग पाडले जात आहेत.”

मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे की, नियमभंग झाल्यास नोटीस देऊन कारवाई करावी किंवा परवाना रद्द करावा; पण कोणतेही मूल्यांकन न करता सरसकट लाउडस्पीकर उतरवणे हे अलोकशाही आणि द्वेषपूर्ण आहे.

बैठकीत सहभागी नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या प्रश्नावर हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यांच्यावर मुस्लिम समाजाचा विश्‍वास असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले. “विशालगडमधील झोपडपट्ट्यांवरील कारवाई, सातारामधील मुस्लिम युवकाची हत्या आणि मीरा रोड दंगलीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नेहमीच समतोल भूमिका घेतली आहे. याही विषयात ते न्याय्य भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे,” असे संघटनांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0