एम्पायर इस्टेट पुलावर अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
दुचाकीचा वेग प्रचंड असल्याने दुचाकीस्वाराने गाडीवरील नियंत्रण सुटले
1 मिनट पठन

दुचाकीचा वेग प्रचंड असल्याने दुचाकीस्वाराने गाडीवरील नियंत्रण सुटले
पिंपरी: एम्पायर इस्टेट ब्रिजवर मंगळवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने दुभाजकाला (डिवायडर) धडक दिली. या अपघातात एका तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

आदित्य बसलिंगप्पा मिटी (वय २९, रा. हडपसर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नांव आहे. आदित्य हा मंगळवारी (दि. ५ मे) रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास एम्पायर इस्टेट ब्रिजवरून आपल्या दुचाकीवरून जात होता. यावेळी दुचाकीचा वेग प्रचंड असल्याने एम्पायर इस्टेट वसाहतीजवळ आदित्यचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट दुभाजकाला जाऊन धडकली.
धडक इतकी जोरात होती की आदित्य गंभीररीत्या जखमी झाला आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर पुलावर रक्ताचा सडा पडला होता. पहाटेच्या वेळी रक्तामुळे रस्ता निसरडा होऊन इतर वाहनांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी पाण्याचा मारा करून रस्ता पूर्णपणे धुवून स्वच्छ केला.
