Greater Noida News : यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला भीषण आग; नऊ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
Greater Noida News : ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला मध्यरात्री भीषण आग लागून नऊ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.
2 मिनट पठन

Greater Noida News : ग्रेटर नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला मध्यरात्री भीषण आग लागून नऊ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतदेह पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत असून, पोलिसांकडून तिकीट बुकिंगच्या आधारे मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.https://maharashtramirror.com/ Greater Noida News
‘राज कल्पना ट्रॅव्हल्स’ची ही स्लीपर बस दिल्लीहून महोबाच्या दिशेने जात होती. बसमध्ये सुमारे ४० ते ५० प्रवासी असल्याची माहिती आहे. प्रवासी गाढ झोपेत असताना बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बसच्या इंजिनच्या बाजूने आणि चालकाच्या केबिनमधून जळण्याचा वास येऊ लागला. त्यानंतर काही वेळातच धूर दिसू लागला. https://maharashtramirror.com/ Greater Noida News
काही प्रवाशांनी चालकाला याबाबत माहिती दिली होती. मात्र, चालकाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. त्यानंतर चालकाच्या सीटजवळून अचानक आगीच्या ज्वाळा भडकल्या आणि काही क्षणांतच आगीने संपूर्ण बसला वेढले.
आग वेगाने पसरल्याने बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक प्रवाशांनी खिडक्यांमधून तसेच बसमधून उड्या मारून आपला जीव वाचवला. अंदाजे २० हून अधिक प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र, काही प्रवासी बसमध्येच अडकून पडले.
महिला प्रवासी रिंकी राजपूत यांनी सांगितले की, त्या झोपेत असताना कोणीतरी बसचा दरवाजा जोरात वाजवत आग लागल्याची माहिती दिली. केबिनबाहेर आल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात धूर आणि प्रवाशांची गर्दी दिसली. धुरामुळे श्वास घेणेही कठीण झाले होते. जीव वाचवण्यासाठी प्रवासी एकमेकांना धक्के देत बाहेर पडत होते. त्यातून त्या कसाबशा बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले.
दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, बसमध्ये काही क्षणांतच इतका धूर भरला की काहीही दिसत नव्हते. त्यामुळे अनेक प्रवाशांनी खिडक्यांमधून बाहेर उड्या मारल्या. मात्र, काहींना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
पाच तास रेस्क्यू ऑपरेशन
घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि यमुना एक्सप्रेसवे सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी आणि बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी सुमारे पाच तास बचावकार्य सुरू होते. बसची बॉडी कटरच्या साहाय्याने कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि ते जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले.
आगीत मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाल्याने त्यांची ओळख पटविणे कठीण झाले आहे. त्यामुळे पोलिसांकडून बसच्या तिकीट बुकिंगची माहिती तपासून मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, चालक आणि बस कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास केला जात आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यमुना एक्सप्रेसवेवरील बस दुर्घटनेची दखल घेत अधिकाऱ्यांना तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. जखमी प्रवाशांना आवश्यक ते उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. दुर्घटनेमागील नेमके कारण आणि संभाव्य निष्काळजीपणाची चौकशी करण्यात येणार आहे.
