Virar Crime Branch : नालासोपारा हत्याकांडातील मुख्य सूत्रधारांसह 'मोस्ट वॉन्टेड' गुन्हेगारांना विरार गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या!
Virar Crime Branch Latest News : शुभम मिश्रा खून प्रकरणाचा छडा; खुनाचा प्रयत्न आणि प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यांतील फरार आरोपीही जेरबंद
2 मिनट पठन

Virar Crime Branch Latest News : शुभम मिश्रा खून प्रकरणाचा छडा; खुनाचा प्रयत्न आणि प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यांतील फरार आरोपीही जेरबंद
नालासोपारा,विरार :- नालासोपारा पश्चिम येथे झालेल्या शुभम ऊर्फ बाबा प्रेमशंकर मिश्रा याच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना पकडण्यात विरार गुन्हे शाखा कक्ष-3 ला मोठे यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या या आरोपींच्या शोधात असलेल्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे नालासोपारा आणि परिसरातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईमुळे खुनाच्या प्रयत्नासारख्या इतर गंभीर गुन्ह्यांतील ‘पाहिजे’ असलेल्या गुन्हेगारांचाही पर्दाफाश झाला आहे.
नेमकी घटना काय?
20 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास नालासोपारा पश्चिम येथील पंचमुखी हनुमान मंदिरासमोर शुभम ऊर्फ बाबा मिश्रा याची जुन्या भांडणाच्या रागातून हत्या करण्यात आली होती. रोशन ऊर्फ पियुष केशव सिम, जगन मायांडी पटकटियार आणि सुनील मालुसरे यांसह त्यांच्या इतर साथीदारांनी शुभमला चाकू आणि दगडाने बेदम मारहाण करून संपवले होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
गुन्हे शाखेची कारवाई आणि आरोपींची अटक
पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 3 चे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे आणि त्यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला.
2 मार्च रोजी सुनील ज्ञानोबा मालुसरे ऊर्फ बिगशो (वय 28) याला ताब्यात घेण्यात आले.
8 मार्च रोजी मुख्य आरोपी जगन मायांडी पटकटियार (वय 27) आणि शरण मुरगण (वय 25) यांनाही अटक करून नालासोपारा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
तपासातून 'पाहिजे' असलेल्या आरोपींचे जाळे उघड
मुख्य आरोपी जगन पटकटियार याचा शोध घेत असताना पोलिसांना इतर तीन सराईत गुन्हेगार सापडले, जे आचोळे आणि वालीव पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न (कलम 307) आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार होत.
1) अजय अमोद मिश्रा (वय 26): आचोळे आणि वालीव पोलीस ठाण्यातील मारहाण व प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात हवा होता.
2) प्रिषीत ऊर्फ दीपक श्रीमोहन पाल (वय 27): आचोळे येथील खुनाचा प्रयत्न आणि दरोड्याच्या गुन्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता.
3) सनि ऊर्फ अभिषेक महेंद्र टाक (वय 26)
आचोळे पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न आणि बेकायदेशीर जमाव जमवून हल्ला केल्याच्या गुन्ह्यात पाहिजे होता.या तिन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी आचोळे पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
पोलिसांची उल्लेखनिय कामगिरी
पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सपोनि सुहास कांबळे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने ही कामगिरी पार पाडली. सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी तांत्रिक तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. या सलग कारवायांमुळे नालासोपारा आणि विरार परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यात पोलिसांना यश आले असून, नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
