Pune News : आरोग्य साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उमेश चव्हाण यांची निवड
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : रुग्णांचे हक्क, गरजू रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे आणि सामाजिक आरोग्य चळवळीत उल्लेखनीय कार्य करणारे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांची भारतीय संविधानाला समर्पित दुसऱ्या आरोग्य साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
1 मिनट पठन

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : रुग्णांचे हक्क, गरजू रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे आणि सामाजिक आरोग्य चळवळीत उल्लेखनीय कार्य करणारे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांची भारतीय संविधानाला समर्पित दुसऱ्या आरोग्य साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हे संमेलन १०, ११ आणि १२ डिसेंबर २०२६ रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहेhttps://maharashtramirror.com/ pune News
भारतीय संविधानातील न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये आरोग्यव्यवस्थेशी जोडत रुग्णांचे हक्क, आरोग्यसेवेतील विषमता, उपचारांचा वाढता खर्च आणि सामाजिक बांधिलकी या विषयांवर संमेलनात विचारमंथन होणार आहे. रुग्ण, डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञ, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यात संवाद घडवून आणणे, हा संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.
उमेश चव्हाण हे रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून रुग्णालयांच्या अवाजवी बिलांविरोधात आवाज उठवणे, गरजू रुग्णांना उपचारांसाठी मदत मिळवून देणे आणि रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहेत. ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘पृथ्वी मोबाईल क्लिनिक’द्वारे वंचित घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे कामही केले जाते.
या निवडीबद्दल चव्हाण म्हणाले, “संविधानातील न्याय, समानता आणि मानवी प्रतिष्ठेची मूल्ये आरोग्यव्यवस्थेत रुजणे आवश्यक आहे. स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी मिळणे हा आनंदासोबतच मोठा सन्मान आहे. या संमेलनातून रुग्णहित आणि संविधानिक मूल्यांवर व्यापक जनसंवाद घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”
या संमेलनामुळे आरोग्य, साहित्य आणि संविधानिक मूल्यांच्या संगमातून समाजाभिमुख आरोग्यव्यवस्थेचा विचार अधिक व्यापक होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
