तुकाराम मुंढे पुन्हा 'ॲक्शन मोड’मध्ये!
एफडीएचा पदभार स्वीकारताच ३३ जण थेट गजाआड तर २८ लाखांची भेसळ जप्त; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी
3 मिनट पठन

एफडीएचा पदभार स्वीकारताच ३३ जण थेट गजाआड तर २८ लाखांची भेसळ जप्त; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी
मुंबई: आपल्या कडक, तडकाफडकी आणि कल्पक कार्यपद्धतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

पदभार स्वीकारून अवघे तीन दिवस उलटत नाही तोच आयुक्त तुकाराम मुंढे थेट 'ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. त्यांनी संपूर्ण राज्यभरात अन्न सुरक्षा मोहिमेचा धडाका लावत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनधिकृत आणि बेकायदेशीर व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. एफडीएच्या विशेष पथकांनी मुंबई, पुणे, नाशिक, कोकण आणि छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी छापे टाकून लाखो रुपयांचा भेसळयुक्त साठा जप्त केला असून बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या टोळ्यांचे कंबरडे मोडले आहे.
पदभार स्वीकारताच कडक इशारा
धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांनी २५ मे २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासनाचे नवे आयुक्त म्हणून आपला पदभार स्वीकारला होता. पदभार हाती घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत त्यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशारा दिला होता. त्यांनी सर्व विभागांतील अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तात्काळ फिल्डवर उतरून संशयास्पद आस्थापनांवर धाडी टाकण्याचे आणि जप्तीची विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले.
सक्त आदेशानंतर अद्भूत तत्परता
आयुक्तांच्या या सक्त आदेशानंतर यंत्रणेने अद्भूत तत्परता दाखवली. बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या सर्व विभागांमध्ये प्रतिबंधित गुटखा विक्रेते, अस्वच्छ अन्न उत्पादक आणि नियमभंग करणाऱ्या मोठ्या डेअरी व बेकरींवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले.
या वादळी मोहिमेदरम्यान अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी गुटखा, पानमसाला व तत्सम प्रतिबंधित अन्नपदार्थ विकणाऱ्या एकूण ५३ संशयास्पद आस्थापनांची कसून तपासणी केली. त्यापैकी ३४ ठिकाणी बंदी असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची सर्रास विक्री होत असल्याचे आढळून आले.
तातडीने एकूण २५ एफआयआर दाखल
या प्रकरणी अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी तातडीने एकूण २५ एफआयआर दाखल केले असून गुन्ह्यात थेट सहभाग असलेल्या ३३ मुख्य आरोपींना अटक करून गजाआड केले आहे. या कारवाईमध्ये गुटख्याची चोरटी वाहतूक करणारी ५ वाहने जप्त करण्यात आली असून, तब्बल २७ बेकायदेशीर आस्थापनांना तात्काळ सील ठोकण्यात आले आहे. या कारवाईत एकूण २० लाख ५७ हजार २९६ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून, यातील सर्वाधिक मोठी कारवाई मुंबई विभागात झाली आहे. मुंबईत १९ आस्थापनांना सील ठोकून १९ आरोपींना गजाआड करण्यात आले आहे.
२३ मोठ्या आस्थापनांची अचानक तपासणी
केवळ गुटखाच नव्हे, तर दैनंदिन खाण्यापिण्यातील इतर जीवनावश्यक वस्तूंमधील भेसळ रोखण्यासाठीही मुंढेंच्या आदेशानुसार २३ मोठ्या आस्थापनांची अचानक तपासणी करण्यात आली. यामध्ये पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, पनीर, खाद्यतेल, तूप, खवा, नुडल्स, ताडी, आईस्क्रीम, स्वीट्स आणि बेकरी पदार्थांच्या दर्जाची आणि शुद्धतेची प्रयोगशाळेमार्फत चाचणी घेण्यात आली.
या धाडीदरम्यान अत्यंत अस्वच्छ आणि असुरक्षित वातावरणात बनवलेला तब्बल २८ लाख ७८ हजार ५७२ रुपयांचा संशयास्पद आणि नियमबाह्य अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या या सर्व अन्नाचे नमुने पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल येताच संबंधित बड्या ब्रँड्स आणि दूध व्यावसायिकांवर कडक फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आला आहे.
अवघ्या ३ दिवसांतील एफडीए कारवाईचा ‘धडक’ ताळेबंद
दोन डझनहून अधिक दुकाने सील: राज्यभरात गुटखा आणि सुगंधित तंबाखू विकणाऱ्या तब्बल २७ दुकानांना व मोठ्या आस्थापनांना थेट सील ठोकण्यात आले आहे.
३३ आरोपी थेट तुरुंगात: कारवाई दरम्यान २५ गंभीर गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले असून गुटखा माफिया आणि भेसळखोरी करणाऱ्या ३३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त: ५३ ठिकाणच्या छाप्यात गुटखा वाहतूक करणारी ५ मोठी वाहने ताब्यात घेण्यात आली असून २०.५७ लाखांचा गुटखा साठा जप्त केला आहे.
अन्न भेसळ रोखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम आणि सर्वात मोठा प्रहार
मुंबईमध्ये धडक कामगिरी: सर्वात मोठी कारवाई मुंबई विभागात पाहायला मिळाली, जेथे १९ वेगवेगळ्या आस्थापनांवर छापे टाकून सर्व १९ दुकाने सील करण्यात आली आणि १९ जणांना बेड्या ठोकल्या.
२८.७८ लाखांचे खाद्यपदार्थ ताब्यात: सर्वसामान्यांच्या ताटात येणारे बनावट दूध, पनीर, तूप आणि खाद्यतेलाच्या २३ मोठ्या केंद्रांवर छापे टाकून २८ लाखांहून अधिक संशयास्पद साठा जप्त केला आहे.
तुकाराम मुंढेंचा कडक इशारा: जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना पळता भुई थोडी होईल. यापुढेही कोणत्याही दबावाला बळी न पडता ही कारवाई अशीच अविरत सुरू राहील, असा सज्जड दम नवनियुक्त आयुक्तांनी दिला आहे.
