सिंहगडावर पर्यटकाचा पाय घसरून तब्बल दीडशे फूट खोल दरीत कोसळला
हवेली पोलिस व आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमच्या शर्थीच्या प्रयत्नांतून जीव वाचला
1 मिनट पठन

हवेली पोलिस व आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमच्या शर्थीच्या प्रयत्नांतून जीव वाचला
दरीत पडल्यामुळे काही वेळातच त्यांची शुद्ध हरपली होती. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी तात्काळ आपत्कालीन सेवा ११२ वर संपर्क साधून आपण दरीत अडकल्याची माहिती दिली
पुणे: सिंहगडावर फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाचा पाय घसरून तो तब्बल दीडशे फूट खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना काल घडली. मात्र हवेली पोलिस व आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमच्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचवण्यात यश आले.

योगेश मोहन शितोळे (वय ३५, रा. शिरूर) असे जखमी पर्यटकाचे नाव आहे. योगेश शितोळे हे रविवारी सकाळी सिंहगडावर फिरण्यासाठी आले होते. दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास ते सिंहगडावरील पश्चिमेकडील ‘हवा पॉईंट’ परिसरात सूर्यास्ताचे फोटो काढण्यासाठी गेले होते. यावेळी गवतावरून त्यांचा पाय घसरला आणि ते सुमारे १५० ते १७० फूट खोल दरीत कोसळले.
आपत्कालीन सेवा ११२ वर संपर्क
दरीत पडल्यामुळे काही वेळातच त्यांची शुद्ध हरपली होती. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी तात्काळ आपत्कालीन सेवा ११२ वर संपर्क साधून आपण दरीत अडकल्याची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हवेली पोलीस स्टेशनचे कर्मचारी अनिकेत काळे यांनी तातडीने आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला माहिती दिली. त्यानंतर रेस्क्यू टीम व हवेली पोलिसांचे पथक तात्काळ सिंहगडावर दाखल झाले. अतिशय धोकादायक परिस्थितीत खोल दरीमध्ये उतरून बचावकार्य राबवण्यात आले.
उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न करत योगेश शितोळे यांना सुरक्षितपणे दरीतून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांनाही देण्यात आली.
या बचावकार्यात रेस्क्यू टीममधील तानाजी भोसले, संतोष भगत, गणेश सपकाळ, संजय चोरघे, नाना जरंडे, कृष्णा मरगळे, उत्तम पिसाळ आणि वैभव भोसले यांनी सहभाग घेतला. तसेच हवेली पोलीस स्टेशनचे अनिकेत काळे व प्रवीन तेलवाडे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
