नारायणगाव बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट
वृद्ध महिलेच्या पर्समधून २ लाख ३४ हजारांची सोनसाखळी लंपास
1 मिनट पठन

वृद्ध महिलेच्या पर्समधून २ लाख ३४ हजारांची सोनसाखळी लंपास
पुणे: नारायणगाव बसस्थानकावर महिला प्रवाशांचे दागिने चोरीला जाण्याच्या घटना सत्र सुरूच असून, एका ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याच्या पत्नीची २ लाख ३४ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन हा प्रकार घडला असून, एकाच दिवशी चोरीची ही दुसरी मोठी घटना समोर आली आहे.

भागवत निवृत्ती गाडगे (वय ७५, रा. उंब्रज नंबर १, ता. जुन्नर) यांनी यासंदर्भात नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गर्दीचा फायदा घेऊन चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २८) दुपारी सव्वाएक ते अडीचच्या सुमारास फिर्यादी भागवत गाडगे आणि त्यांची पत्नी प्रवासासाठी नारायणगाव बसस्थानकावर आले होते. बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती. बस आल्यानंतर त्यात चढत असताना, कोणातरी अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेऊन गाडगे यांच्या पत्नीच्या पर्समधील सोन्याची चैन शिताफीने चोरली.
लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीस
चोरट्याने चोरलेली सोन्याची चेन १५.२७० ग्रॅम वजनाची असून तिची बाजारभावानुसार किंमत २ लाख ३४ हजार ४४८ रुपये इतकी आहे. ही चेन पिळेदार बनावटीची होती. बसमध्ये बसल्यानंतर काही वेळाने पर्स तपासली असता, चेन चोरीला गेल्याचे गाडगे दांपत्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
नारायणगाव परिसरात बसस्थानक आणि बाजारपेठेत चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, नागरिकांनी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पोलीस हवालदार बोकड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
