ठाण्यात फळविक्रेत्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावणारा चोरटा पकडला
नौपाडा पोलिसांची दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून मोठी कारवाई
2 मिनट पठन

नौपाडा पोलिसांची दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून मोठी कारवाई
ठाणे: ठाणे येथील गावदेवी नौपाडा भागात फळविक्री करणाऱ्या एका वृद्ध महिलेला गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरी चोरी करून पसार झालेल्या एका अट्टल चोरट्याला नौपाडा पोलिसांनी अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. कर्जबाजारी झाल्यामुळे ही चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली असून, पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीला गेलेले १ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

या क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले. रेल्वे स्थानक, लोकल प्रवास, रिक्षा प्रवास आणि गुप्त बातमीदारांचे जाळे या सर्व तांत्रिक व मानवी कौशल्यांचा वापर करत पोलिसांनी आरोपीला कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले.
रीतसर तक्रार दाखल केली
याबाबत इंदु बबन आवटे (वय ६५ वर्षे, व्यवसाय- फळ विक्री, रा. ठाणे) यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०९(४) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. ही घटना सोमवार (ता. १८) रोजी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ठाणे महानगरपालिका महिला स्वच्छतागृहाच्या समोरील बाजूस असलेल्या गावदेवी गार्डनजवळील गावदेवी नौपाडा येथील फळविक्रीच्या दुकानावर घडली होती.
असा घडला प्रसंग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय वृद्ध फिर्यादी इंदु आवटे या गावदेवी परिसरात फळविक्रीचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. १८ मे रोजी सायंकाळी त्या आपल्या दुकानावर असताना, एका अनोळखी भामट्याने त्यांच्यासमोर येऊन गळ्यातील सोन्याची मण्यांची पोत बळजबरीने हिसकावून घेतली आणि तो राम मारुती रस्ता, नौपाडाच्या दिशेने पळून गेला.
सखोल तपासात मिळाले धागेदोरे
या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे करत होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपीच्या पळण्याच्या मार्गावरील सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून उघड झाले की, चोरी केल्यानंतर आरोपीने ठाणे रेल्वे स्थानकातून लोकलने डोंबिवली असा प्रवास केला आणि डोंबिवलीत उतरून पुढे रिक्षाने उल्हासनगर गाठले.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीची ओळख पटवून पोलीस उल्हासनगर येथील शास्त्रीनगर भागात पोहोचले. तेथे चौकशी दरम्यान आरोपी हा शास्त्रीनगरमधील बुद्धविहार समोरील गल्लीत राहणारा शमुवेल विलास जगधने (वय ३० वर्षे, धंदा- वायरमन, रा. शास्त्रीनगर, उल्हासनगर) असल्याचे स्पष्ट झाले.
सापळा रचून घेतले ताब्यात
तो पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या चोरीच्या तयारीत असताना, पोलिसांनी सापळा रचून त्याला कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत तो कर्जबाजारी झाल्याने त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ५५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची जुनी सोन्याची मण्यांची पोत आणि ५५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे गुजराती डिझाईनचे सोन्याचे पॅडल असा एकूण १ लाख १० हजार रुपये किमतीचा चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही अभिमानास्पद कामगिरी ठाणे शहर पोलीस उपआयुक्त सुभाष बुरसे, साहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय दवणे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) लक्ष्मण राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे आणि पोलीस अंमलदार देसाई, कांगणे, तिर्थकर, उभे, धोंडे, गायकवाड, रांजणे, गोलवड, तडवी व शिंदे यांच्या विशेष पथकाने केली आहे.
