भोंदू खरातचा थरार: आता 'पॉक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल; शालेय विद्यार्थ्यांवरही अत्याचाराचा संतापजनक आरोप
Ashok Kharat Latest News : रुपाली ठोंबरेंचा चाकणकरांवर प्रहार, तर सुषमा अंधारेंनी केसरकर-सावेंचे फोटो दाखवून महायुतीला घेरले; 'कॉल रेकॉर्ड' तपासण्याची मागणी
2 मिनट पठन

Ashok Kharat Latest News : रुपाली ठोंबरेंचा चाकणकरांवर प्रहार, तर सुषमा अंधारेंनी केसरकर-सावेंचे फोटो दाखवून महायुतीला घेरले; 'कॉल रेकॉर्ड' तपासण्याची मागणी
नाशिक/मुंबई :- अध्यात्माच्या बुरख्याआड वासनेचा बाजार मांडणाऱ्या नाशिकच्या अशोक खरात याच्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरला आहे. महिलांवरील अत्याचारानंतर आता या नराधमाने शालेय विद्यार्थ्यांनाही सोडले नसल्याचे समोर आले असून, त्याच्यावर पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत अत्यंत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या खरातची 'एसआयटी' (SIT) कडून कसून चौकशी सुरू असतानाच, या प्रकरणाने आता मोठे राजकीय युद्ध पेटवले आहे.
आई-वडील बाहेर अन् नराधमाचा आत अत्याचार
अशोक खरातने केवळ महिलांनाच नाही, तर अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांनाही आपल्या जाळ्यात ओढले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुलांचे आई-वडील बाहेर उभे असताना या भोंदूने आत मुलांवर लैंगिक अत्याचार केले. या संतापजनक प्रकारामुळे खरातवर 'पॉक्सो' कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, यामुळे त्याला जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
रुपाली ठोंबरेंचा '100 फटक्यांचा' इशारा
खरातवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होताच रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधत म्हटले, "चाकणकर, तू घटनात्मक पदावर बसून महाराष्ट्रातील माता-भगिनी आणि लेकरांच्या कुटुंबाचे वाटोळे केले आहेस. तुला तात्काळ अटक झाली पाहिजे. तुझे चोचले पुरवणाऱ्या लोकांसह तुला 100 फटके मारून एक मोजले पाहिजे." या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सुषमा अंधारेंचे 'फोटो बॉम्ब' आणि चौकशीची मागणी
शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारमधील नेत्यांचे खरातसोबतचे संबंध चव्हाट्यावर आणले. त्यांनी भाजपचे मंत्री अतुल सावे आणि शिवसेना (शिंदे गट) नेते दीपक केसरकर यांचे खरातसोबतचे फोटो माध्यमांना दाखवले.
केसरकरांवर निशाणा: "दीपक केसरकर आणि अशोक खरात यांचा नेमका काय संबंध आहे? केसरकर आणि चाकणकर यांचे 'कॉल रेकॉर्ड' एसआयटीने तपासावेत," अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.
एसआयटी चौकशी: या बड्या नेत्यांची एसआयटीमार्फत चौकशी करून त्यांच्यातील आर्थिक आणि राजकीय हितसंबंधांचा शोध घ्यावा, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
आरोपी खरात 29 मार्चपर्यंत कोठडीत
न्यायालयाने अशोक खरातची पोलीस कोठडी 29 मार्चपर्यंत वाढवली आहे. त्याच्या आश्रमातून काही संशयास्पद कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले असून, एसआयटी आता त्याच्या आर्थिक नाड्या तपासत आहे. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
