Thane Crime Branch : ठाणे गुन्हे शाखेचा 'मास्टरस्ट्रोक'! घरफोडी करणाऱ्या सराईत चोराला बेड्या; 48 गुन्हे उघड,1.39 कोटींचे सोने हस्तगत
Thane Crime Branch Latest News : दिवसा घरफोडी करणाऱ्या शिवाजी संतेचे 'नेटवर्क' उद्ध्वस्त; 1 किलोहून अधिक सोने जप्त, गुन्हे शाखा घटक-1 ची मोठी कामगिरी
1 मिनट पठन

Thane Crime Branch Latest News : दिवसा घरफोडी करणाऱ्या शिवाजी संतेचे 'नेटवर्क' उद्ध्वस्त; 1 किलोहून अधिक सोने जप्त, गुन्हे शाखा घटक-1 ची मोठी कामगिरी
ठाणे :- ठाणे गुन्हे शाखेने मुंब्रा आणि दिवा परिसरात उच्छाद मांडणाऱ्या एका सराईत घरफोड्याला जेरबंद करून एक मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले तब्बल 48 गुन्हे उघडकीस आले असून, आरोपीकडून 1 कोटी 39 लाख रुपये किमतीचे 1 किलो 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. Thane Police Latest News
मुंब्रा आणि दिवा भागात बंद घरांचे खिडकीचे ग्रिल आणि मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरी होण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. या घटनांचा तपास करताना गुन्हे शाखा घटक-1 च्या पथकाने शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासामध्ये आरोपी शिवाजी गोपाळ संते हा अत्यंत चपळ असल्याचे दिसून आले. तो पोलिसांची नजर चुकवण्यासाठी मुद्दाम उलट्या दिशेने प्रवास करायचा आणि प्रवासासाठी विविध साधनांचा वापर करायचा. लोखंडी रॉडच्या साहाय्याने घरफोडी करण्यात तो निष्णात होता.
गुन्हे शाखेच्या पथकाने सलग 15 दिवस तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा पाठलाग केला. अखेर 2 मार्च 2026 रोजी टिटवाळा पूर्व येथून शिवाजी गोपाळ संते याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीअंती त्याने मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील तीन वर्षांत केलेले 48 गुन्हे कबूल केले. आरोपीच्या घराची आणि परिसराची झडती घेतली असता तब्बल 1 कोटी 39 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांना सापडले.
शिवाजी संते हा मूळचा टिटवाळा येथील रहिवासी असून, त्याच्यावर यापूर्वीही कल्याण आणि उल्हासनगर भागात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दिवसा बंद असलेल्या घरांना लक्ष्य करण्याची त्याची पद्धत होती.
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले आणि पोलीस उप-आयुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उप-निरीक्षक दीपक घुगे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने ही धाडसी मोहीम फत्ते केली आहे. या मोठ्या कारवाईमुळे ठाणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, घरफोडी करणाऱ्या सराईत चोराला गजाआड करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
