Sunetra Pawar : "दादा, तुमची उणीव शब्दांत मांडणे अशक्य" ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
•अजित पवारांच्या निधनाला 2 महिने पूर्ण, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भावूक पोस्ट
1 मिनट पठन

•अजित पवारांच्या निधनाला 2 महिने पूर्ण, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भावूक पोस्ट
बारामती :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कणखर नेतृत्व अजित पवार यांच्या निधनाला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान लँड होत असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचे निधन झाले होते. या धक्क्यातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नसतानाच, त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट शेअर करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
"मन अजूनही तुमच्याच आठवणीत…"
सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टची सुरुवात करताना म्हटले की, "आज तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले. काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे. प्रत्येक क्षणी तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते. तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास आणि बळ निर्माण करणारे आधारस्तंभ होतात."
मार्गदर्शक दीप आणि विचारधारेचा वारसा
अजित पवारांच्या कामाच्या पद्धतीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, "तुमच्यातील लोकाभिमुख आणि विकासाभिमुख व्यक्तिमत्व मला कायम मार्गदर्शन करेल. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची वाटचाल तुमच्या प्रेरणेनेच अखंड सुरू आहे. लोककल्याणाचे निर्णय घेताना 'या परिस्थितीत तुम्ही काय केले असते?', हा विचार करूनच मी प्रत्येक पाऊल उचलते."
स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार
"तुमच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. पण तुम्ही दिलेली शिकवण आणि तुमचा वारसा हेच आता पुढचा मार्ग उजळवणारे दीप आहेत. दादा, तुमची स्वप्ने आणि तुमचे कार्य पुढे नेण्याचा निर्धार मी कायम मनाशी जपेन," अशा शब्दांत त्यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.
28 जानेवारीचा तो काळा दिवस
28 जानेवारी 2p26 रोजी बारामती विमानतळावर विमान उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या अपघातात अजित पवारांचे निधन झाले होते. या घटनेने संपूर्ण देशात शोककळा पसरली होती. त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या राजकारणाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली असली, तरी वैयक्तिक आयुष्यात 'दादां'ची कमी त्यांना सातत्याने जाणवत आहे.
