मुख्य सामग्री पर जाएँ

भोर तालुक्यात अघोरी तंत्राचा धक्कादायक प्रकार

बेशुद्ध पुतण्याला रुग्णालयात नेणाऱ्या काकावर दगडफेक, मारहाणीत दात पडले

पघ
प्रशिक घस्ते

2 मिनट पठन

भोर तालुक्यात अघोरी तंत्राचा धक्कादायक प्रकार

बेशुद्ध पुतण्याला रुग्णालयात नेणाऱ्या काकावर दगडफेक, मारहाणीत दात पडले

पुणे: अंधश्रद्धा आणि अघोरी विचारांतून आजारी पुतण्याला रुग्णालयात नेण्यास विरोध करत, मदतीला धावलेल्या काका व चुलत भावावर शेजाऱ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना भोर तालुक्यातील पसुरे येथे घडली आहे. “त्याला देवाचा त्रास आहे, रुग्णालयात न्यायचे नाही,” असे म्हणत आरोपींनी केलेल्या मारहाणीत फिर्यादीचे तीन दात पडले असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी भोर पोलिसांनी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत उत्तम ग्यानबा शिंदे (वय ५४, धंदा- चालक, रा. पसुरे, ता. भोर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी अंकुश माने, आदित्य माने आणि गणेश माने (सर्व रा. भुतुंडे, ता. भोर, जि. पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. १८) रात्री ११:४० वाजेच्या सुमारास मौजे पसुरे येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री फिर्यादी उत्तम शिंदे यांच्या घरी त्यांचा पुतण्या स्वप्निल गौतम शिंदे याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडला. पुतण्याची प्रकृती चिंताजनक वाटल्याने उत्तम शिंदे आणि त्यांचा मुलगा संदेश हे दोघे त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याची तयारी करत होते.

’हा देवाचा कोप आहे, दवाखान्यात नेऊ नका!'
ते स्वप्निल याला रुग्णालयात नेण्यासाठी निघाले असता, शेजारी राहणारे अंकुश माने, आदित्य माने आणि गणेश माने तेथे आले. त्यांनी अंधश्रद्धेतून “याला देवाचा त्रास आहे, याला रुग्णालयात घेऊन जायचे नाही,” असे ओरडत वाद घालण्यास सुरुवात केली. फिर्यादीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी त्यांच्या अंगावर धावून आले व त्यांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

दगडाने तोंड ठेचले; तीन दात पडले
आरोपींनी उत्तम शिंदे आणि त्यांच्या मुलाला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद एवढा पेटला की, आरोपी अंकुश माने आणि आदित्य माने यांनी तिथेच पडलेला मोठा दगड हातात घेतला. अंकुश माने याने उत्तम यांच्या तोंडावर दगडाने जोरात प्रहार केला. या भीषण हल्ल्यामुळे उत्तम शिंदे यांच्या तोंडातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या, ज्यामध्ये त्यांचा वरील एक आणि खालील दोन असे एकूण तीन दात जागीच पडले. तसेच आदित्य माने याने त्यांच्या उजव्या हाताच्या दंडावर दगड मारून त्यांना गंभीर दुखापत केली.

एकीकडे रुग्णाची प्रकृती खालावलेली असताना दुसरीकडे अंधश्रद्धेपोटी उपचाराला विरोध करून रुग्णालयात नेणाऱ्या काकावरच असा पाशवी हल्ला झाल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. जखमी उत्तम शिंदे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोर पोलिसांनी या अंधश्रद्धेच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून तिन्ही आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पोलीस उपनिरीक्षक खुटवड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पुणे क्राईम न्यूज

शेयर करें