मुंढवा जमीन घोटाळ्यात शीतल तेजवानीला जामीन मंजूर
पोलिसांच्या चुकीचा फायदा; रिमांड प्रक्रियेतील गंभीर त्रुटींवर उच्च न्यायालयाचे ताशेरे; अटक आणि ताबा आदेश बेकायदेशीर घोषित
2 मिनट पठन

पोलिसांच्या चुकीचा फायदा; रिमांड प्रक्रियेतील गंभीर त्रुटींवर उच्च न्यायालयाचे ताशेरे; अटक आणि ताबा आदेश बेकायदेशीर घोषित
पुणे: पुण्यातील गाजलेल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, पोलिसांच्या तांत्रिक हलगर्जीपणाचा फायदा तिला जामीन मिळण्यात झाला आहे. बावधन आणि पिंपरी पोलिसांनी अटकेच्या वेळी आणि रिमांड प्रक्रियेत आवश्यक कायदेशीर निकष न पाळल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तपासातील त्रुटींवरून पुणे पोलिसांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह
पोलिसांच्या या ढिसाळ कारभारामुळेच ही अटक प्रक्रिया आणि त्यानंतरचे रिमांड आदेश बेकायदेशीर ठरवण्यात आले असून, आरोपीला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्त करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे तपासातील त्रुटींवरून पुणे पोलिसांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ही चूक जाणीवपूर्वक झाली की निव्वळ हलगर्जीपणामुळे, याची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.
ताब्यात घेताना अटकेचे ठोस कारण दिले नाही
न्यायालयाच्या आदेशानुसार, १६ डिसेंबर २०२५ रोजी बावधन पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ५२३/२०२५ अंतर्गत झालेली अटक आणि त्यानंतरचे सर्व रिमांड आदेश तांत्रिक कारणास्तव अवैध ठरवण्यात आले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेताना अटकेचे ठोस कारण न देणे आणि पिंपरी येथील सेवा विकास बँक प्रकरणात अटकेपूर्वी दोन तास आधी माहिती देण्याच्या नियमाचे उल्लंघन करणे, या बाबी न्यायालयाने गांभीर्याने घेतल्या आहेत. तसेच, ३ जानेवारी २०२६ रोजी पिंपरी पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ८०६/२०१९ अंतर्गत झालेली अटक प्रक्रियाही बेकायदेशीर ठरवत न्यायालयाने सर्व ताबा आदेश रद्द केले आहेत. या तांत्रिक त्रुटींमुळे तपास अधिकाऱ्यांच्या कामकाजावर ओढलेले ताशेरे पोलीस दलासाठी मोठी चपराक मानली जात आहे.
शीतल तेजवानीवर कठोर अटी
जामीन मंजूर करताना न्यायालयाने शीतल तेजवानीवर काही कठोर अटीही लादल्या आहेत. ५० हजार रुपयांचा वैयक्तिक जामीन आणि तितक्याच रकमेचे जामीनदार सादर करण्यासोबतच, तिने कोणत्याही पुराव्यांशी छेडछाड करू नये आणि साक्षीदारांवर दबाव आणू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या गरजेनुसार चौकशीला हजर राहणे आणि न्यायालयात नियमित हजेरी लावणे आरोपीला बंधनकारक करण्यात आले असून, या अटींचे उल्लंघन झाल्यास जामीन रद्द करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे.
जरी या दोन गुन्ह्यांत तेजवानीला दिलासा मिळाला असला, तरी पुणे पोलिसांच्या इतर काही प्रकरणांमुळे तिचा तुरुंगातील मुक्काम अद्याप वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रकरणातील पुढील कायदेशीर घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sheetal Tejwani granted bail in Mundhwa land scam
