मुख्य सामग्री पर जाएँ

Share Market Fraud : शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची लूट करणारे बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त

Share Market Latest News : महापेतील 'टेक्नॉसिटी'मध्ये आर्थिक गुप्तवार्ता पथकाचा छापा; 1 कोटींहून अधिकचा अपहार उघड, 2 आरोपींना बेड्या

व
विवेक

2 मिनट पठन

Share Market Fraud : शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची लूट करणारे बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त

Share Market Latest News : महापेतील 'टेक्नॉसिटी'मध्ये आर्थिक गुप्तवार्ता पथकाचा छापा; 1 कोटींहून अधिकचा अपहार उघड, 2 आरोपींना बेड्या

नवी मुंबई :- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. महापे येथील टेक्नॉसिटी इमारतीत सुरू असलेल्या एका बोगस कॉल सेंटरवर आर्थिक गुप्तवार्ता पथक आणि सायबर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 1 कोटी 2 लाख 58 हजार 818 रुपयांच्या फसवणुकीचा छडा लावला आहे. Share Market Latest Fraud News

बोगस कॉल सेंटरचे 'मोडस ऑपरेंडी'

मिळालेल्या माहितीनुसार, 'DG Share Market Research' या नावाने महापेतील टेक्नॉसिटीमध्ये हे कार्यालय सुरू होते. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तिथे 22 तरुण-तरुणी संगणकावर बसून व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि कॉलद्वारे नागरिकांना जाळ्यात ओढण्याचे काम करत होते. 'इंट्राडे ट्रेडिंग' आणि 'इक्विटी स्टॉक'मध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा मिळेल, असे खोटे आश्वासन देऊन हे लोक ग्राहकांकडून पेमेन्ट लिंकद्वारे पैसे उकळत असत. तपासात असे दिसून आले की, फसवणुकीची ही रक्कम 18 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली होती.

देशभरात फसवणुकीचे धागेदोरे

नवी मुंबई पोलिसांनी गृह मंत्रालयाच्या 'नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल'वर (NCCRP) कॉल सेंटरमधील बँक खात्यांची तपासणी केली असता, या खात्यांशी संबंधित संपूर्ण देशातून 5 सायबर तक्रारी आधीच नोंद असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. फसवणुकीचा हा आकडा 1 कोटींच्या पुढे असून तपासाअंती तो आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुख्य आरोपी गजाआड

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे.

1) शिवम विनोदकुमार दुबे (29 वय): रहिवासी दिवा, ठाणे.

2) सुजित मसिचरण वाल्मीकी (30 वय): रहिवासी अंबरनाथ.

या प्रकरणातील तिसरा मुख्य आरोपी सूरज दुबे (रा. कोपरखैरणे) सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींना 15 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुप्तवार्ता कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र जाधव आणि सायबर सेलचे विशाल पाटील यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज गोरे आणि पोउपनिरी अभय काकड यांचा समावेश होता.

शेयर करें