Sanjay Raut : "तुमचा आत्मा जिवंत असेल, तर गृहखात्याचा त्याग करा!"; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर मर्माघात
Sanjay Raut On Devendra Fadnavis : अहिल्यानगरमधील 11 वर्षांच्या मुलीवरील ॲसिड हल्ल्यावरून खासदार राऊत आक्रमक; निधी वाटप आणि 'ऑपरेशन टायगर'वरही डागली तोफ
2 मिनट पठन

Sanjay Raut On Devendra Fadnavis : अहिल्यानगरमधील 11 वर्षांच्या मुलीवरील ॲसिड हल्ल्यावरून खासदार राऊत आक्रमक; निधी वाटप आणि 'ऑपरेशन टायगर'वरही डागली तोफ
मुंबई :- अहिल्यानगर (अहमदनगर) येथे एका 11 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. "गृहमंत्र्यांचा आत्मा अजूनही जिवंत असेल, तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा," अशी मागणी राऊतांनी केली आहे.
"ॲसिड फेकलेली मुलगी म्हणजे निर्जीव बाहुली होती, असे उत्तर सरकार देऊ शकते"
अहिल्यानगरमधील घटनेवर संताप व्यक्त करताना राऊत म्हणाले की, सरकार महिलांच्या सुरक्षेचा कितीही दावा करत असले, तरी प्रत्यक्षात मुली सुरक्षित नाहीत."देवेंद्र फडणवीस विधानसभेत असेही उत्तर देऊ शकतात की, ज्या मुलीवर ॲसिड फेकले गेले, ती मुलगी नसून एखादी निर्जीव बाहुली होती. हे सरकार भ्रष्टाचाराने आणि पैशाने इतके आंधळे झाले आहे की त्यांना जनतेचे दुःख दिसत नाही."
विरोधी पक्षाच्या आमदारांची 'निधी कोंडी'
विकास निधीच्या वाटपावरून राऊतांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरले.
सुडाचे राजकारण: "विरोधी पक्षाच्या आमदारांना एक रुपयाही निधी द्यायचा नाही, अशी स्पष्ट सूचना फडणवीसांनी दिली आहे. हा पैसा काय यांच्या बापजाद्यांनी धुणी-भांडी करून कमावला आहे का? हा जनतेचा पैसा आहे आणि तो वाटताना दुजाभाव करणे चुकीचे आहे."
कामात व्यस्तता: "गृहमंत्र्यांचा संपूर्ण वेळ केवळ विरोधकांची हेरगिरी करण्यात, त्यांच्यावर सुडाने कारवाई करण्यात आणि त्यांची कोंडी करण्यातच जातो आहे," असा आरोपही त्यांनी केला.
'ऑपरेशन टायगर' आणि दिल्लीचा इतिहास
महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय फोडाफोडीवर (ऑपरेशन टायगर) भाष्य करताना त्यांनी दिल्लीच्या इतिहासाची आठवण करून दिली. "पानिपतापासून मोगल काळापर्यंतचा इतिहास साक्षी आहे की, जे जे लोक इकडे 'ऑपरेशन' करायला आले, ते स्वतःच निर्वस्त्र होऊन आपल्या राज्यात परत गेले. सध्या सत्ताधारी गटामध्येच अंतर्गत कुरघोड्यांचे 'ऑपरेशन' सुरू असून त्याची सूत्रे दिल्लीतून हलवली जात आहेत," असा दावा राऊतांनी केला.
गृहमंत्र्यांच्या अपयशाचा पाढा
राऊत पुढे म्हणाले की, राज्याच्या गृहमंत्र्यांकडे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वेळच नाही. त्यांचा अर्धा वेळ दिल्ली वाऱ्यांमध्ये जातो. जर त्यांना राज्यातील मुलींच्या अब्रूची आणि सुरक्षिततेची थोडी जरी काळजी असेल, तर त्यांनी गृहखात्याचा त्याग करावा.
